Pune 1 Crore Robbery : पुण्यातील कात्रज-देहू रोड बायपासवरील नवले पुलावर तोतया पत्रकार आणि पोलिसांनी मिळून १ कोटी रुपयांची रोकड लंपास करण्यासाठी मोठा कट रचला, रोकड लंपास केली सुद्धा मात्र एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे हा प्रकार उघड झाला, त्यानंतर मात्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न्चींह उभं राहिलं, मात्र हा कट कसा रचला गेला, कोण कोण या जाळ्यात अडकलं आणि अखेर एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याने हा हाय-प्रोफाइल गेम कसा उलटवला?
पुण्यात 1 कोटींच्या दरोड्याचा कट? CCTV मुळे पोलिसांचा पर्दाफाश : Pune 1 Crore Robbery
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली तळेगाव दाभाडे येथून. तिथले एक स्टेशनरी व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांच्याकडे व्यवसायाची मोठी उलाढाल असायची. १८ जुलै रोजी त्यांच्याकडे तब्बल १ कोटी रुपयांची रोकड जमा झाली होती. ही रक्कम बँकेत भरणा करणार होते. पवार यांनी आपला चालक विक्रम चाकणकर याला गाडी काढायला सांगितली. विक्रम अनेक वर्षांपासून पवार यांच्याकडे काम करत होता…
गाडीत १ कोटी रुपयांची रोख रक्कम ठेवली, एवढी मोठी रक्कम आयुष्यात पुन्हा एकत्र पाहता येणार नाही हे विक्रमने ओळखलं… गाडी तळेगाववरून निघण्यापूर्वीच विक्रमने आपल्या मोबाईलवरून पुण्यातील आपल्या गुन्हेगारी साथीदारांना मेसेज पाठवला. पार्टी निघाली आहे, गाडीत १ कोटी माल आहे, पोझिशन घ्या… हा एका मेसेज संपूर्ण कटाची पहिली ठिणगी ठरला. विक्रमने ठरवून गाडी बँकेकडे न नेता मुद्दाम नवले पुलाच्या दिशेने वळवली, जेणेकरून हायवेवर त्याच्या साथीदारांना डाव साधणे सोपे जाईल.
दुपारच्या सुमारास गाडी नवले पुलाजवळ पोहोचली. विक्रमने आधीच ठरल्याप्रमाणे गाडीचा वेग कमी केला. तितक्यात मागून आलेल्या एका दुचाकीने पवार यांच्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे आडवी मारली. दुचाकीवरून दोन तरुण उतरले. त्यांनी गाडीजवळ येऊन पवार आणि त्यांचे सहकारी किरण आपटे यांना दमदाटी सुरू केली. आम्ही पोलीस आहोत… तुम्ही बेकायदेशीर आणि काळा पैसा घेऊन चालला आहात. गाडी बाजूला घ्या आणि बॅगा आमच्या ताब्यात द्या,अशी शामकी दिली…
हेही वाचा : BoB खातेदारांनी त्वरित करा ‘ही’ 5 कामे, नाहीतर होऊ शकते फसवणूक
नवले पुलावर तोतया पोलिसांनी आणि पत्रकाराने रचला मोठा कट
पवार आणि आपटे काही समजायच्या आतच त्या तोतया पोलिसांनी गाडीत हात घालून पैशांच्या बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न केला. गाडीत एक कोटी रुपयांच्या दोन वेगवेगळ्या बॅगा होत्या. चालू गाडीत आणि भर रस्त्यात पैशांची ओढाताण सुरू झाली. पण याच गोंधळात फिर्यादी पवार यांचे सहकारी किरण आपटे यांनी प्रसंगावधान दाखवले. त्यांनी आपल्या हातातील ७३.५ लाख रुपयांची मुख्य बॅग घट्ट पकडली, गाडीचा दरवाजा उघडला आणि धावत्या गर्दीत पळ काढला. त्यांनी ती बॅग एका सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली. आरोपींनी आपटे यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण हायवेवरील वाहतुकीमुळे त्यांना ते शक्य झाले नाही. ७३.५ लाख रुपये हातचे गेल्यामुळे आरोपी संतप्त झाले, पण गाडीत अजूनही २६.५० लाख रुपयांची दुसरी बॅग शिल्लक होती.
तोतया पत्रकार आशिष तिवारीची भूमिका काय? : Pune 1 Crore Robbery
आता आरोपींनी पवार आणि चालक विक्रम चाकणकर यांना धमकावून गाडीतच डांबले आणि खेड शिवापूर पोलीस चौकीच्या दिशेने गाडी नेली. गुन्हेगारांनी गुन्ह्याचे ठिकाण पोलीस चौकीच निवडल्यामुळे हा कट किती पूर्वनियोजित होता, हे स्पष्ट होते. गाडी खेड शिवापूर चौकीत पोहोचताच तिथे या कथेचा मुख्य व्हिलन दाखल झाला, तो म्हणजे आशिष तिवारी. आशिष तिवारी हा स्वतःला एका मोठा पत्रकार म्हणवून घ्यायचा, पण प्रत्यक्षात तो एक खंडणीखोर तोतया पत्रकार होता.
चौकीत आधीच राजगड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या खेड शिवापूर आउटपोस्टवर तैनात असलेले दोन पोलीस कर्मचारी हजर होते, महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्त्री. नागरिकांचे रक्षण करणाऱ्या या वर्दीधारी पोलिसांनी जेव्हा २६.५० लाखांची बॅग पाहिली, तेव्हा त्यांचे डोळे चक्रावले. तोतया पत्रकार आशिष तिवारी याने तिथे मध्यस्थाची भूमिका वठवण्यास सुरुवात केली. त्याने पवार यांना भीती दाखवली, हा ब्लॅक मनी आहे. जर इन्कम टॅक्स आणि मीडियामध्ये हे प्रकरण गेले, तर तुम्ही आयुष्यभरातून उठाल. गुन्हा दाखल झाला तर देशोधडीला लागाल. त्यापेक्षा हे प्रकरण इथेच मिटवा.
गुन्हेगार, तोतया पत्रकार आणि दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळून तिथे चक्रव्यूह रचला. कायद्याची भीती दाखवून पवारांची उरलेली रक्कमही हडप करण्याचा हा खेळ होता. या अभद्र युतीने पवारांवर इतका मानसिक दबाव आणला की पवार हतबल झाले. याच गोंधळाचा फायदा घेऊन, महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम यांच्या संगनमताने, आशिष तिवारी याने त्या बॅगेतील २० लाख रुपयांची थप्पी बाजूला काढली. ही रक्कम अधिकृत जप्त न दाखवता स्वतःच्या खिशात घालण्याचा त्यांचा प्लान होता. तिवारीने ती २० लाखांची कॅश घेतली आणि चौकीच्या बाहेर उभ्या असलेल्या आपल्या दुचाकीच्या डिक्कीत लपवून ठेवली.
CCTV फुटेजमुळे संपूर्ण कट कसा उघड झाला?
Pune 1 Crore Robbery : आरोपींचा प्लान १०० टक्के यशस्वी झाला होता. १ कोटींपैकी २० लाख तरी त्यांच्या खिशात आले होते आणि उरलेले ६.५० लाख शासकीय दप्तरी जमा करून पवारांना कोर्टाची पायरी दाखवण्याची तयारी सुरू होती. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एक चूक नक्की करतो. या केसमध्ये ती चूक ठरली खेड शिवापूर चौकीच्या बाहेरील एक तिसरा डोळा.
खेड शिवापूर चौकीच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, ही गोष्ट आरोपी पोलिसांना आणि तोतया पत्रकाराला ठाऊक होती. पण चौकीच्या अगदी समोर असलेल्या एका हॉटेलचा आणि रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरा थेट चौकीच्या पार्किंगवर नजर ठेवून होता….
दरम्यान, नवले पुलावर झालेल्या घटनेची माहिती पुणे ग्रामीणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली होती. कंट्रोल रूम कडून मेसेज फ्लॅश झाला की एका व्यावसायिकाची गाडी अडवून कोट्यवधी रुपये लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि एक पथक खेड शिवापूर चौकीत दाखल झाले. वरिष्ठ अधिकारी अचानक चौकीत आल्याचे पाहताच प्रमिला निकम, अजित मेस्त्री आणि आशिष तिवारी यांचे धाबे दणाणले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संशयावरून चौकीसमोरील हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, त्या फुटेजमध्ये तोतया पत्रकार आशिष तिवारी हा चौकीतून बाहेर येऊन, आजूबाजूला पाहत, अत्यंत घाईघाईत २० लाख रुपयांची कॅश आपल्या दुचाकीच्या डिक्कीत कोंबताना स्पष्ट दिसत होता.
Pune Police : रंगेहात पुरावा मिळाल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिवारीला जाब विचारला. पकडले गेल्याचे समजताच घाबरलेल्या तिवारीने डिक्कीतून ती २० लाखांची रोकड काढून पुन्हा गुपचूप व्यावसायिकाच्या बॅगेत ठेवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. वर्दीतील भक्षकांचे आणि बोगस पत्रकाराचे बिंग पूर्णपणे फुटले होते.
अटक झालेले आरोपी कोण? : Pune 1 Crore Robbery
पुणे पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी करून नऱ्हे पोलीस ठाण्यात एकूण १० जणांवर दरोडा, तोतयागिरी आणि भ्रष्टाचाराच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
१. विक्रम चाकणकर – फिर्यादी व्यावसायिकाचा मुख्य चालक, ज्याने पैशांची गुप्त माहिती लीक करून संपूर्ण दरोड्याची टिप दिली.
२. आशिष तिवारी – पत्रकारितेच्या नावाखाली खंडणी उकळणारा आणि पोलीस चौकीत बसून २० लाखांची चोरी करणारा मुख्य मास्टरमाइंड.
३. प्रमिला निकम – खेड शिवापूर चौकीत कर्तव्यावर असताना गुन्हेगारांशी हातमिळवणी करून लाचखोरी आणि चोरीला पाठिंबा देणारी पोलीस कर्मचारी.
४. अजित मेस्त्री – खाकी वर्दीचा गैरवापर करून व्यावसायिकाला धमकावण्यात आणि रोकड हडप करण्यात मदत करणारा दुसरा पोलीस कर्मचारी.
५. अमेय कार्ले आणि गणेश कदम – नवले पुलावर गाडी अडवून तोतया पोलीस बनून लूटमार करणारे ऑन-फील्ड गुन्हेगार.
यांच्याव्यतिरिक्त या कटात सामील असलेले इतर ४ संशयित साथीदार आहेत, ज्यांनी रेकी करणे आणि पळून जाण्यास मदत करण्याचे काम केले होते. यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत….
नऱ्हे पोलिसांनी धडक कारवाई करत मुख्य सूत्रधार तोतया पत्रकार आशिष तिवारी, चालक विक्रम चाकणकर, अमेय कार्ले आणि गणेश कदम या चार आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. खाकी वर्दीला काळिमा फासणाऱ्या महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्त्री या दोघांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी तात्काळ शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच हे दोन्ही पोलीस कर्मचारी कायद्याच्या हाताला चकवा देऊन फरार झाले आहेत. फरार झालेल्या दोन्ही निलंबित पोलिसांसह इतर सहा आरोपींच्या शोधासाठी पुणे ग्रामीण आणि गुन्हे शाखेची एकूण ४ ते ५ पथके रवाना करण्यात आली आहेत. त्यांचे मोबाईल लोकेशन्स तपासले जात आहेत.
या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोहोचला? : Pune 1 Crore Robbery
व्यावसायिकाच्या सहकाऱ्याने दाखवलेले प्रसंगावधान आणि वरिष्ठ पोलिसांचा तात्काळ हस्तक्षेप यामुळे १ कोटी रुपयांची संपूर्ण रोकड सुरक्षित असून ती पोलिसांच्या देखरेखीखाली जप्त करण्यात आली आहे. नवले पुलावरील या प्रकाराने पुण्यात तोतया पत्रकार आणि पोलिसांच्या नावाखाली सुरू असलेल्या एका मोठ्या खंडणीखोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा गुन्हेगारांचे धाडस कसे वाढते, याचे हे एक जिवंत उदाहरण ठरले आहे.









