Bank of Baroda data leak: बँक ऑफ बडोदाचा 1 TB डेटा लीक झाल्याचा दावा समोर आल्यानंतर खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. संभाव्य सायबर फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी तातडीने ही महत्त्वाची कामे करावीत.
सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणात डेटा सायबर हल्ल्यातून लीक झाल्याचा दावा समोर आला आहे. काही अहवालांनुसार,
हॅकर्सनी बँकेच्या प्रणालीमध्ये घुसखोरी करून मोठ्या प्रमाणात संवेदनशील माहिती हस्तगत केल्याचा आणि ती डार्क वेबवर उपलब्ध करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मात्र, बँक ऑफ बडोदाने अद्याप डेटा चोरी झाल्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. या दाव्यांची पडताळणी सुरू असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: पिंपरी- चिंचवडमध्ये दोन अल्पवयीन बहिणींवरील अत्याचार प्रकरण; ६५ वर्षीय आरोपी अटकेत
ग्राहकांसाठी सर्वात मोठा धोका कोणता?
सायबर तज्ज्ञांच्या मते, अशा घटनांनंतर थेट खात्यातील पैसे चोरी होण्यापेक्षा फिशिंग, बनावट कॉल, ई-मेल किंवा सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. फसवे लोक स्वतःला बँकेचे अधिकारी असल्याचे सांगून वैयक्तिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात.
ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी?
इंटरनेट बँकिंगचे पासवर्ड तातडीने बदला
जर एकाच पासवर्डचा वापर अनेक वेबसाइट किंवा अॅप्सवर करत असाल, तर तो त्वरित बदला. मजबूत, लांब आणि अंदाज लावणे कठीण असे पासवर्ड वापरा. जन्मतारीख, मोबाईल क्रमांक किंवा नाव यांसारखी सहज ओळखता येणारी माहिती टाळा.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्रिय ठेवा
मोबाईल बँकिंगमध्ये फिंगरप्रिंट, फेस आयडी किंवा टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) उपलब्ध असल्यास ते सुरू ठेवा. यामुळे अतिरिक्त सुरक्षा मिळते.
ई-मेल खात्याची सुरक्षितता वाढवा
बँक खात्याशी जोडलेले ई-मेल खाते सुरक्षित असणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. पासवर्ड बदलणे, ओटीपी किंवा इतर महत्त्वाच्या सूचना अनेकदा ई-मेलद्वारे पाठवल्या जातात.
प्रत्येक व्यवहारावर लक्ष ठेवा
सायबर गुन्हेगार कधी कधी सुरुवातीला अगदी कमी रकमेचा व्यवहार करून खाते सक्रिय आहे का, याची खात्री करतात. त्यामुळे छोट्या रकमेचे व्यवहारही तपासा आणि काही दिवस नियमितपणे बँकिंग अॅप किंवा खाते स्टेटमेंट पाहत राहा.
डेटा लीक म्हणजे खात्यातील पैसे लगेच धोक्यात येतात का?
डेटा लीक झाल्याचा अर्थ असा नाही की हॅकर्सना लगेचच खात्यातील पैसे काढता येतील. आधुनिक बँकिंग प्रणालीमध्ये व्यवहार पूर्ण करण्यासाठी अनेक सुरक्षा स्तर असतात.
ग्राहकाचे नाव, खाते क्रमांक किंवा आधार क्रमांक यांसारखी माहिती मिळाल्याने थेट व्यवहार करता येत नाही. त्यासाठी इंटरनेट बँकिंग लॉगिन, व्यवहाराचा पासवर्ड, यूपीआय पिन, डेबिट कार्ड पिन, ओटीपी यांसारख्या अतिरिक्त पडताळण्या आवश्यक असतात.
ही माहिती कोणालाही देऊ नका
ग्राहकांनी खालील गोपनीय माहिती फोन, एसएमएस, ई-मेल किंवा सोशल मीडियावर कोणाशीही शेअर करू नये:
ओटीपी (OTP)
एटीएम किंवा डेबिट कार्ड पिन
कार्डचा सीव्हीव्ही (CVV)
यूपीआय पिन
इंटरनेट किंवा मोबाईल बँकिंगचा पासवर्ड
बँकेचे अधिकारी किंवा अधिकृत कर्मचारी कधीही ग्राहकांकडून अशा प्रकारची गोपनीय माहिती मागत नाहीत. अशा प्रकारचा कॉल किंवा संदेश आल्यास सावध राहून त्वरित बँकेशी संपर्क साधावा.









