Pimpri Chinchwad Crime: पिंपरी- चिंचवड शहरातून मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी ६५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीविरोधात पॉक्सो (POCSO) तसेच अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: राज्यात पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुली आपल्या कुटुंबासह पिंपरी-चिंचवड परिसरात राहतात. त्यांच्या कुटुंबातील सदस्य रोजंदारीवर कामासाठी बाहेर जात असल्याने काही वेळ मुली घरी एकट्याच असत. या परिस्थितीचा गैरफायदा घेत शेजारी राहणाऱ्या आरोपीने मोठ्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
घटनेच्या दिवशी सकाळी शाळेतून परतल्यानंतर मुलगी घरी आली असता परिसरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिला धमकावून हा प्रकार कुणालाही सांगू नये, असे बजावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
शेजारी महिलेच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड
घटनेदरम्यान शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या संशयामुळे हा प्रकार उघडकीस आला. संबंधित महिलेने मुलीच्या पालकांना घडलेली बाब सांगितल्यानंतर त्यांनी मुलीशी विश्वासाने संवाद साधला. त्यावेळी पीडितेने आपल्यावर यापूर्वीही अनेक वेळा अत्याचार झाल्याची माहिती दिली.
चौकशीदरम्यान तिने आपल्या चार वर्षीय बहिणीबाबतही धक्कादायक माहिती दिली. आरोपीने तिच्याशीही गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही बाब समोर येताच कुटुंबीयांनी तातडीने वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
आरोपीविरोधात गंभीर गुन्हे दाखल
पीडित कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला तातडीने ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्यासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









