Breaking News :
  • Home
  • फूड
  • मुंढे साहेब, चांगलं खायची सवय लावू नका! FDAच्या धडक कारवायांनंतर जनतेचा सवाल, बदली झाली तर पुढे काय?
महाराष्ट्र

मुंढे साहेब, चांगलं खायची सवय लावू नका! FDAच्या धडक कारवायांनंतर जनतेचा सवाल, बदली झाली तर पुढे काय?

Tukaram Mundhe FDA Action
0
Tukaram Mundhe FDA Action: हॉटेल्सच्या किचनपासून गुटखा-पानमसाल्यापर्यंत आणि भेसळखोरांवरही FDAचा धडाका सुरू आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचं कौतुक होत असतानाच आता सर्वसामान्यांच्या मनात एक प्रश्न आहे.

“चांगलं खायची सवय लावू नका आम्हाला, तुमची बदली झाली तर काय?” हा सवाल सध्या सोशल मीडियापासून सर्वसामान्यांच्या चर्चेपर्यंत ऐकायला मिळतोय. कारण महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्नभेसळ, अस्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत धडक कारवाई सुरू केली आहे.

मुंढे यांनी २५ मे २०२६ रोजी FDA आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर राज्यभरात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर तपासणी आणि कारवाईचा वेग वाढला. याच पार्श्वभूमीवर आता प्रश्न उपस्थित होतोय. एखादा कडक अधिकारी बदलला, तर सुरू झालेली ही मोहीम तितक्याच ताकदीने पुढे सुरू राहील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा: Double Income, No Kids! DINK म्हणजे काय? तरुण जोडपी पालकत्वाचा निर्णय का टाळतायत?

मुंढे FDA आयुक्त झाल्यानंतर नेमकं काय बदललं? (Tukaram Mundhe FDA Action)

FDA आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळखोर, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रेते आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांविरोधात कारवाई तीव्र करण्यात आली.

पदभार स्वीकारल्यानंतरच्या सुरुवातीच्या काही दिवसांतच गुटखा- पानमसाला विक्रीविरोधात कारवाई करण्यात आली. विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले, गुन्हे दाखल करण्यात आले आणि काही आस्थापनांवर सीलची कारवाई करण्यात आली.

दुधातील भेसळ रोखण्यासाठीही FDAकडून राज्यव्यापी मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान बनावट किंवा सिंथेटिक दूध तयार करणाऱ्या युनिट्सवरही कारवाई झाल्याचे समोर आले आहे.

हॉटेल्सपासून शाळांच्या कँटीनपर्यंत तपासणी

मुंढे (Tukaram Mundhe news) यांच्या नेतृत्वाखाली FDAने केवळ मोठ्या हॉटेल्स किंवा खाद्य व्यवसायांपुरती कारवाई मर्यादित ठेवली नाही. रेस्टॉरंट्स, खाद्य उत्पादक, विक्रेते आणि इतर खाद्य व्यवसायांची तपासणी करण्यात आली.

शाळा, महाविद्यालये, वसतिगृहांच्या मेस आणि मध्यान्ह भोजन देणाऱ्या ठिकाणीही अन्न सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. FDAने यासाठी ‘Safe Food For Every Child in Maharashtra’ ही राज्यव्यापी मोहीम सुरू केली आहे.

अस्वच्छ स्वयंपाकघर, खाद्यपदार्थांची अयोग्य साठवणूक, नियमांचे उल्लंघन आणि इतर त्रुटींवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केलं आहे.

जनतेला मिळतोय फायदा, पण पुढे काय?

अन्न सुरक्षा नियमांची अंमलबजावणी ही केवळ एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्यशैलीवर अवलंबून राहणारी बाब नाही. ती सातत्याने सुरू राहणं महत्त्वाचं आहे.

मुंढे यांच्या कारवाईमुळे अन्न व्यवसायांमध्ये नियम पाळण्याबाबत दबाव निर्माण झाल्याचं चित्र आहे. Reutersनेही त्यांच्या नेतृत्वाखालील कारवाईमुळे खाद्य व्यवसायांमध्ये स्वच्छतेच्या पद्धती सुधारल्याचे आणि ग्राहकांचा विश्वास वाढल्याचे नमूद केले आहे.

मात्र, एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर हीच कठोरता कायम राहणार का, हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.

“मुंढे साहेबांची बदली होणार?” अफवा का पसरली?

ऑगस्टमध्ये सोशल मीडियावर तुकाराम मुंढे यांची राजस्थानमध्ये बदली झाल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. त्यात ही त्यांची 26वी बदली असल्याचाही दावा करण्यात आला.

मात्र हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंढे हे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी असून, सध्या ते महाराष्ट्र FDA आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वतःही राजस्थानला बदली झाल्याची चर्चा फेटाळून लावली. महाराष्ट्राच्या DGIPRकडूनही हा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

त्यामुळे सध्या “मुंढे यांची बदली झाली” अशी कोणतीही अधिकृत माहिती नाही.

21 वर्षांत 25 बदल्या; त्यामुळे चर्चेला उधाण

तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा मुद्दा चर्चेत येण्यामागे त्यांचा मागील प्रशासकीय इतिहासही कारणीभूत आहे. 21 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत त्यांची 25वी बदली झाल्याचे वृत्त त्यांच्या FDA नियुक्तीच्या वेळी प्रसिद्ध झाले होते.

यामुळेच त्यांच्या प्रत्येक नव्या नियुक्तीनंतर “मुंढे किती दिवस टिकणार?” हा प्रश्न चर्चेत येतो.

मात्र सध्या त्यांची FDAमधून बदली झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

कारवाईसोबत काही प्रश्नही उपस्थित

मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDAच्या कारवाईला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असला, तरी प्रशासनाच्या काही निर्णयांवर न्यायालयीन पातळीवर प्रश्नही उपस्थित झाले आहेत.

अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील एका मिठाई दुकानाच्या परवाना निलंबनाच्या प्रकरणात FDAला 5 लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले. पुनर्तपासणीत दुकानाने 36 पैकी 35 अन्न सुरक्षा निकषांचे पालन केल्याचे आढळल्यानंतरही परवाना पूर्ववत करण्यात न आल्याच्या पार्श्वभूमीवर हा आदेश देण्यात आला.

म्हणजेच, अन्न सुरक्षेच्या नियमांची कठोर अंमलबजावणी महत्त्वाची असली, तरी कारवाई करताना नियमांची अचूक प्रक्रिया आणि व्यावसायिकांनाही न्याय मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे.

हेही वाचा: रोहित पवारांच्या PAच्या 12 वर्षीय मुलीचा मृत्यू; 9:58 वाजता CCTV फुटेजमध्ये काय दिसलं?

“चांगलं खायची सवय लावू नका…” हा सवाल का महत्त्वाचा?

मुंढे यांच्या कारवाईवर कौतुकाचा वर्षाव होत असताना सर्वसामान्यांचा सवाल मात्र वेगळा आहे—“आज कारवाई होतेय, पण उद्या अधिकारी बदलला तर हीच व्यवस्था कायम राहणार का?”

गुटखा, भेसळयुक्त दूध, अस्वच्छ खाद्यपदार्थ किंवा नियमबाह्य खाद्य व्यवसायांविरोधातील कारवाई ही एखाद्या एका अधिकाऱ्यापुरती मर्यादित राहू नये. FDAची यंत्रणा अधिक सक्षम होऊन अशा मोहिमा सातत्याने राबवत राहणं हीच खरी गरज आहे.

कारण शेवटी प्रश्न तुकाराम मुंढे नावाच्या एका अधिकाऱ्याचा नाही, तर प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळण्याच्या अधिकाराचा आहे.

आणि म्हणूनच आजचा सर्वात मोठा सवाल असा—
“मुंढे साहेब, तुम्ही असाल किंवा नसाल… पण आम्हाला चांगलं, स्वच्छ आणि भेसळमुक्त अन्न मिळण्याची ही सवय कायम राहणार का?”

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts