Hardik Pandya: आयपीएलमधील पुढील वाटचालीबाबत चर्चा सुरू असतानाच हार्दिक पांड्या नव्या अवतारात दिसला. गर्लफ्रेंडसोबत मंदिरात पोहोचलेल्या हार्दिकचे फोटो व्हायरल होत आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएलमधील त्याच्या भविष्यासंदर्भात विविध चर्चा सुरू असतानाच हार्दिक एका वेगळ्याच कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
हार्दिक पांड्या (Hardik Pandya) नुकताच आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात (Tirupati) दर्शनासाठी पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत माहिका शर्मा देखील उपस्थित होती. मंदिरातील त्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्याच्या बदललेल्या लूकची विशेष दखल घेतली.
हार्दिकने आपल्या लूकमध्ये मोठा बदल केला असून, त्याने डोक्यावरील केस पूर्णपणे काढले आहेत. नव्या स्टाइलमधील हार्दिक पाहून अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटले. मात्र, त्याने हा बदल नेमका कोणत्या कारणामुळे केला, याबाबत कोणतीहीअधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, आयपीएलमधील (IPL Trade) हार्दिकच्या पुढील प्रवासाबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. मुंबई इंडियन्ससोबत (Mumbai Indians) त्याच्या भवितव्यावर चर्चा सुरू असून, काही संघ त्याला आपल्या ताफ्यात घेण्यास इच्छुक असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र कोणताही अंतिम निर्णय किंवा अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
आयपीएल 2027 मध्ये हार्दिक कोणत्या संघाकडून खेळणार?
आयपीएल 2024 पूर्वी हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी रोहित शर्माच्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी त्याने गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. मात्र, मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. 2024 मध्ये संघ गुणतालिकेत तळाशी राहिला. 2025 मध्येही सुरुवात निराशाजनक झाली होती, पण नंतर संघाने पुनरागमन करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला. मात्र, अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. त्यानंतरच्या हंगामात मुंबई इंडियन्सने 14 पैकी 10 सामने गमावले आणि गुणतालिकेत नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले.









