Amravati NICU Fire: ज्या कक्षात चिमुकल्यांच्या आयुष्याची नवी पहाट उगवणार होती, तिथेच काळरात्र ठरली. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता कक्षाला सोमवारी पहाटे अचानक आग लागली. या भीषण दुर्घटनेत तीन नवजात चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक बालकांना वेळीच सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अखेर NICU मध्ये नेमकं काय घडलं? आग कशामुळे लागली? चला, जाणून घेऊया.
विदर्भातील महत्त्वाचे शहर म्हणून ओळख असलेल्या अमरावतीला ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वारशाची समृद्ध परंपरा लाभली आहे. याच शहरात एक धक्कादायक घटना घडल्याने महाराष्ट्र हादरलं आहे. अमरावती जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात (Amravati NICU fire) सोमवारी पहाटे एका अत्यंत दुर्दैवी घटना घडली. रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला अचानक आग लागली. या घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू (three newborns dead Amravati) झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास NICU मधील वैद्यकीय उपकरणामध्ये बिघाड झाल्यानंतर आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागल्यानंतर कक्षात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आणि रुग्णालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी कक्षात तब्बल ३९ नवजात बालकांवर उपचार सुरू होते.
हेही वाचा: 2027 पासून वस्तूंचीही ‘डिजिटल ओळख’! EUच्या ‘या’ नव्या नियमाचा भारताला किती फटका?
डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून तातडीने बचावकार्य
घटनेची माहिती मिळताच ड्युटीवरील डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी कोणताही वेळ न दवडता बचावकार्य सुरू केले. धुराचे लोट आणि आगीची तीव्रता वाढत असतानाही कर्मचाऱ्यांनी अनेक बालकांना NICU मधून सुरक्षितपणे बाहेर काढले.
वेळीच करण्यात आलेल्या या बचावकार्यामुळे मोठी जीवितहानी टाळल्याचे सांगितले जात आहे. बाहेर काढण्यात आलेल्या बालकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले.
सहा बालकांना पुढील उपचारासाठी हलवले
या दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात समोर आले आहे. तर सहा बालकांना पुढील उपचारांसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत वैद्यकीय पथकाकडून निरीक्षण केले जात आहे.
दरम्यान, NICU मध्ये आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. व्हेंटिलेटर किंवा अन्य वैद्यकीय उपकरणातील तांत्रिक बिघाडामुळे आग लागली का, याची चौकशी केली जात आहे.
आगीत मृत्युमुखी पडलेल्या नवजात बाळांची माहिती
अमरावती (Amravati news today) जिल्हा स्त्री रुग्णालयातील NICU ला लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या तीन नवजात बालकांची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पूजा बोरगे यांचा मुलगा — रा. पुलगाव, वर्धा
गायत्री प्रफुल चोपडे यांचा मुलगा — रा. मुरखेड, ता. अंजनगाव सुर्जी
किरण बेठेकर यांची मुलगी — रा. बोराळा, ता. चिखलदरा
धक्कादायक माहिती
मिळालेल्या माहितीनुसार, याच रुग्णालयात २०२२ सालीही भीषण आग लागल्याची घटना घडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घटनेची चौकशी सुरू होण्याची शक्यता
या घटनेनंतर रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय उपकरणांची देखभाल आणि आपत्कालीन परिस्थितीत करण्यात येणाऱ्या बचावव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आगीचे नेमके कारण तपासणीनंतर स्पष्ट होणार आहे.
अमरावतीतील या घटनेने रुग्णालय प्रशासनासह नागरिकांमध्येही चिंता निर्माण झाली असून, मृत बालकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.








