– निरंजन कामत / कोल्हापूर प्रतिनिधी
Kolhapur Cyber Fraud Case : सायबर गुन्ह्यांतून मिळालेली कोट्यवधी रुपयांची रक्कम बनावट बँक खाती उघडून विविध खात्यांमध्ये वर्ग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा कोल्हापूर पोलिसांच्या सायबर पथकाने पर्दाफाश केला. सुमारे शंभर कोटी रुपयांहून अधिक रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळविण्याच्या तयारीत असलेल्या तीन सायबर गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील चौथ्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
ताब्यात घेतलेल्यांमध्ये नितीश कुमार नवीन कुमार दहिया (वय २१, रोहतक, हरियाणा), अनुप रोहितास यादव (वय २८, बेहरोड, राजस्थान) आणि अमित धरमापाल यादव (वय २८, हरियाणा) यांचा समावेश आहे. तर करमवीर ऊर्फ विजेंद्र सिंह (रा. सिकर, राजस्थान) हा संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा गुन्हा पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सायबर गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सायबर पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांना या टोळीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शाहूपुरीतील चौथ्या गल्लीमधील स्वस्तिक प्लाझाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या कार्यालयावर कारवाई केली.
बनावट शेल कंपनीच्या नावावर खाती ( Kolhapur Cyber Fraud Case )
आरोपींनी ‘टोरकोलाईन पॉवर टूल्स प्रा. लि.’ या नावाने कंपनी स्थापन केली होती. भारत सरकारच्या उद्यम रजिस्ट्रेशनवर कंपनीची नोंदणी करून कोल्हापूर परिसरातील विविध बँकांमध्ये कंपनीच्या नावाने करंट अकाउंट उघडण्यात आले होते. सायबर गुन्ह्यांमधून येणारी रक्कम या खात्यांमध्ये जमा करून त्यातील ठराविक टक्केवारीनुसार हिस्सा वाटून घेण्याची तयारी असल्याचे तपासात समोर आले.
बँक खाती उघडण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम करमवीर ऊर्फ विजेंद्र सिंह पुरवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. १ जुलै २०२६ पासून कोल्हापुरात या कंपनीच्या माध्यमातून हा प्रकार सुरू असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा : राऊतांना तुरुंगात विष दिलं जात होतं ? राहुल गांधींचा Toxic Test चा सल्ला
एपीके फाइलच्या माध्यमातून फसवणुकीचा प्रयत्न ( Kolhapur Cyber Fraud Case )
पोलिसांनी आरोपींच्या मोबाइलची तपासणी केली असता काही व्यक्तींशी रक्कम वळविण्याबाबत झालेले चॅटिंग आढळून आले. सायबर गुन्ह्यांतील रक्कम रिमोट ॲक्सेसच्या माध्यमातून वर्ग करण्यासाठी एपीके फाइल्सच्या कार्यप्रणालीचा वापर केल्याचेही तपासात समोर आले आहे. सायबर पथकाने कंपनीच्या कार्यालयाची झडती घेतली. यावेळी विविध बँकांतील कंपनीच्या नावाची १४ चेकबुक्स, १० ऑनलाइन पेमेंट क्यूआर कोड, दोन क्यूआर कोड मशीन, कंपनीच्या नावाचे दोन रबरी स्टॅम्प, एक गोल शिक्का, स्टॅम्पपॅड, पासबुक, सात बँकांची डेबिट कार्ड्स, सिमकार्ड, कंपनीचे लेटरहेड, लॅपटॉप, बनावट पत्त्यांच्या आधारकार्डच्या प्रती जप्त करण्यात आल्या.
याशिवाय उद्यम रजिस्ट्रेशनच्या ऑनलाइन प्रिंट्स, भाडेकरारपत्रे, बनावट बँक खात्यांच्या नोंदी असलेली कागदपत्रे, एक लाँग नोटबुक, चार मोबाइल हँडसेट आणि महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ असा सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
रोख रक्कम आणि क्रिप्टोमध्ये रूपांतराची तयारी ( 100 Crore Cyber Fraud )
सायबर गुन्ह्यातून मिळालेली रक्कम नेट बँकिंगसह अन्य माध्यमांतून विविध बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करणे, त्यानंतर रोख स्वरूपात काढणे तसेच क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतर करून रक्कम ठिकाणावर लावण्याचा प्रयत्न आरोपींकडून सुरू असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
शाहूपुरीतील स्वस्तिक प्लाझामध्ये थाटलेले कार्यालय हे प्रत्यक्षात केवळ नावापुरते असल्याचे तपासात समोर आले. कंपनीच्या नावाखाली विविध बँक खाती उघडून सायबर गुन्ह्यांमधून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांची रक्कम वळविण्याचा कट या टोळीने आखला होता. अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र ताटे, मीनाक्षी पाटील, पोलिस हवालदार सचिन देसाई, अमर आडसुळे, सागर माळवे, अमरसिंह वासुदेव, सुरेश राठोड, रविंद्र पाटील, सुकुमार जाधव, संगिता खोत, आसीफ कलयगार, रोहित शिंदे, ऋषिकेश खोत, अजय सावंत, विनायक बाबर, पल्लवी मोहिते आणि अंकिता जठारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.



