Imtiaz Khatri Threat Case : वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरातील अनधिकृत मशिदीवरील कारवाईनंतर प्रसिद्ध व्यावसायिक इम्तियाज खत्री यांना देण्यात आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणाचा तपास करताना पाकिस्तान कनेक्शन समोर आल्याचा दावा मुंबई गुन्हे शाखेने केला आहे. गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर पथकाने महाबळेश्वर येथून मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन (वय ३९) याला अटक केली आहे.
तपासात शफीकचे वडील आणि दोन मोठे भाऊ पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे राहत असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एका भावाचा पाकिस्तानातील प्रतिबंधित दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. हा भाऊ २०१९ मध्ये पाकिस्तानात गेल्याची माहिती असून, तो संघटनेत कमांडर पदापर्यंत पोहोचल्याची शक्यता तपासली जात आहे.
पाकिस्तानी क्रमांकांवरून धमक्यांचा संशय
इम्तियाज खत्री ( Imtiaz Khatri ) यांनी २२ जून रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. २१ मेपासून त्यांना सातत्याने धमकीचे संदेश आणि कॉल येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. तपासादरम्यान शफीकच्या मोबाईलमध्ये धमकीचे व्हॉट्सॲप संदेश आणि व्हॉइस नोट्स आढळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या संवादांमध्ये पाकिस्तानी तसेच अन्य आंतरराष्ट्रीय क्रमांकांचा वापर झाल्याचे तपासात समोर आले आहे.
आयपी ॲड्रेस आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे काही क्रमांक पाकिस्तानस्थित इंटरनेट सेवा पुरवठादारांशी संबंधित असल्याचे निदर्शनास आले आहे.
शफीकच्या नावावर असलेल्या भारतीय मोबाईल क्रमांकावर एका पाकिस्तानी क्रमांकावरून सातत्याने संपर्क होत असल्याचे तांत्रिक तपासात आढळले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने महाबळेश्वर गाठून शफीकला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन आणि एक पॉकेट डायरी जप्त करण्यात आली आहे.
यातील एका मोबाईलचे अलीकडेच फॉरमॅटिंग करण्यात आले होते. त्यामुळे डिलीट करण्यात आलेला डेटा आणि संभाषणांचा तपशील मिळविण्यासाठी हा फोन डिजिटल फॉरेन्सिक एक्स्ट्रॅक्शनसाठी पाठविण्यात आला आहे.
हेही वाचा : उसाच्या शेतात लपला होता सोनसाखळी चोर! ‘जॅक’ने शोधून काढलं
‘फैयाज काश्मिरी’चा दावा ( Imtiaz Khatri Threat Case )
चौकशीदरम्यान शफीकने पाकिस्तानी मोबाईल क्रमांक हा ‘फैयाज काश्मिरी’ नावाच्या व्यक्तीचा असल्याचा दावा केल्याची माहिती आहे. फेसबुकच्या माध्यमातून या व्यक्तीशी ओळख झाल्याचेही त्याने सांगितले आहे. तपास यंत्रणांना या क्रमांकाशी संबंधित ‘ब्लॅक गोल्ड’ आणि ‘फैयाज काश्मिरी’ अशा ऑनलाइन ओळखी आढळल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या सर्व दाव्यांची पोलिसांकडून पडताळणी सुरू असून, शफीकचे पाकिस्तानी संपर्क, कौटुंबिक पार्श्वभूमी, सीमापार संवाद आणि संवेदनशील माहितीची देवाणघेवाण झाली आहे का, या दिशेने गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे.









