OYO Rooms New Rules : नागपूर शहरातील OYO Rooms आणि ऑनलाइन रूम बुकिंग व्यवस्थेबाबत प्रशासनाकडून अधिक कडक नियम लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रूम बुकिंगच्या माध्यमातून येणाऱ्या-जाणाऱ्या ग्राहकांची नोंद, सुरक्षेच्या दृष्टीने CCTV व्यवस्था आणि हॉटेल्सच्या कामकाजावर देखरेख याबाबत नवी नियमावली तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. OYO संदर्भातील नियमांबाबत आपली पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहत नियमावली तयार केल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
OYO हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची नोंद ठेवावी लागणार? ( OYO Rooms New Rules )
नव्या नियमावलीनुसार OYO किंवा संबंधित हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची माहिती आणि आवश्यक रेकॉर्ड व्यवस्थित ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हॉटेल व्यवस्थापनाने ग्राहकांच्या नोंदी उपलब्ध ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.
याशिवाय हॉटेल परिसरातील CCTV फुटेज ठराविक कालावधीसाठी सुरक्षित ठेवण्याचा नियम लागू करण्याची तयारी असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे एखादी घटना घडल्यास तपासासाठी पोलिसांना आवश्यक माहिती मिळण्यास मदत होऊ शकते.
हेही वाचा : उसाच्या शेतात लपला होता सोनसाखळी चोर! ‘जॅक’ने शोधून काढलं
प्रत्येक OYO बोर्डचीही होणार तपासणी?
नागपूर शहरातील अनेक हॉटेल्सवर OYO संबंधित बोर्ड दिसून येत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. एखाद्या हॉटेलला OYO शी जोडण्यामागील प्रक्रिया आणि त्याची नोंदणी याबाबतही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.
हॉटेल्समध्ये नियमांचे पालन होत आहे की नाही, ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था आहे का आणि संबंधित कागदपत्रे व्यवस्थित आहेत का, याची पाहणी पोलिसांकडून केली जाऊ शकते.
नागपूरनंतर राज्यभर नियम लागू होणार?
सध्या नागपूरमध्ये तयार करण्यात येणाऱ्या नियमावलीकडे विशेष लक्ष लागले आहे. हीच नियमावली भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रातील OYO Rooms आणि ऑनलाइन रूम बुकिंगशी संबंधित हॉटेल्ससाठी लागू केली जाणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
ऑनलाइन हॉटेल बुकिंगचा व्यवसाय गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी ग्राहकांची सुरक्षितता, हॉटेल व्यवस्थापनाची जबाबदारी आणि कायदा-सुव्यवस्था या सर्व बाबींचा विचार करून नियम निश्चित करण्याची गरज असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
पोलिसांची OYO Rooms वर नजर वाढणार
नागपूरमध्ये या संदर्भातील नियमावली अधिक प्रभावीपणे राबवली गेल्यास OYOशी संबंधित हॉटेल्सवर पोलिसांची देखरेख वाढण्याची शक्यता आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित हॉटेल व्यवस्थापनावर कारवाई होऊ शकते.
दरम्यान, नागपूरमधील ही नियमावली संपूर्ण महाराष्ट्रातील OYO Rooms साठी लागू होणार का आणि त्यात नेमके कोणते नियम असतील, याबाबत आगामी काळात अधिकृत निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे.









