SEMICON India 2026: भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्राला वेग देण्यासाठी मोठ्या प्रकल्पांची तयारी सुरू आहे. SEMICON India 2026 मध्ये पंतप्रधान मोदींनी चिप निर्मिती आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाबाबत सरकारचा रोडमॅप मांडला.
भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रासाठी सेमीकंडक्टर उद्योगाला केंद्रस्थानी ठेवून मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. देशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची क्षमता वाढत असताना आता चिप निर्मिती, टेस्टिंग आणि पॅकेजिंगच्या पायाभूत सुविधांवरही भर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये SEMICON India 2026 चे उद्घाटन केले.
तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, चिप डिझाइन आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा होत आहे. उद्योग क्षेत्रातील कंपन्या, सरकारी प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
हेही वाचा: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! 10वी-12वीच्या डेटशीटची प्रतीक्षा संपणार? ‘या’ कालावधीत होऊ शकते घोषणा
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारताची मोठी झेप
गेल्या दशकभरात भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राचा विस्तार झाल्याचे सरकारी आकडेवारीतून दिसते. २०१४ -१५ मध्ये देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचे मूल्य सुमारे १.९ लाख कोटी होते. २०२४ -२५ पर्यंत हा आकडा वाढून सुमारे १२ लाख कोटी झाला. उत्पादन वाढण्यासोबतच भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीतही वाढ झाली आहे. 2014-15 मध्ये सुमारे ₹38 हजार कोटींची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात होत होती. आता हीच निर्यात ₹3.3 लाख कोटींवर पोहोचल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.
चिप निर्मितीसाठी केंद्राचा विशेष कार्यक्रम
भारताला सेमीकंडक्टर उत्पादनाच्या क्षेत्रात सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2022 मध्ये Semicon India Programme सुरू केले.
या कार्यक्रमाचा उद्देश चिपच्या संपूर्ण इकोसिस्टमला प्रोत्साहन देणे हा आहे. यात चिप डिझाइन, उत्पादन, टेस्टिंग, असेंब्ली आणि पॅकेजिंग यांसारख्या विविध प्रक्रियांचा समावेश होतो.
सरकारी माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ₹1.6 लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या 10 सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.
यातील Micron आणि Kaynes यांच्या दोन प्रकल्पांमध्ये उत्पादन सुरू झाले असून, आणखी दोन प्रकल्प या वर्षात सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसाठी चिप डिझाइनची दारे खुली
सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावरही भर दिला जात आहे.
चिप डिझाइनसाठी आवश्यक असलेली सॉफ्टवेअर टूल्स आठ कंपन्यांकडून देशातील 315 विद्यापीठांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या सुविधेचा वापर आतापर्यंत 200 लाखांपेक्षा जास्त तास करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातून 75 संस्थांनी मिळून 211 चिप डिझाइन विकसित केली आहेत.
याशिवाय विविध उपयोगांसाठी चिप तयार करण्याच्या 24 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
कॅमेरा, ड्रोनपासून सॅटेलाइटपर्यंत चिप्सचा वापर
मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये विविध क्षेत्रांसाठी लागणाऱ्या चिप्सच्या निर्मितीचा समावेश आहे.
व्हिडिओ कॅमेरा, ड्रोन डिटेक्शन सिस्टम, स्मार्ट वीज मीटर, मायक्रोप्रोसेसर, सॅटेलाइट, ब्रॉडबँड आणि इंटरनेटशी संबंधित उपकरणांसाठी चिप विकसित करण्याचे काम सुरू आहे.
यातील 14 कंपन्यांना त्यांची उत्पादने बाजारात आणण्यासाठी गुंतवणूकदारांकडून ₹650 कोटींपेक्षा जास्त निधी मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.
आतापर्यंत सात चिप्स यशस्वीरीत्या तयार झाल्या असून, त्यामध्ये 12 नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित चिपचाही समावेश आहे.
सहा राज्यांमध्ये चिप उद्योगाचा विस्तार
सेमीकंडक्टरशी संबंधित प्रकल्पांचा विस्तार देशातील विविध राज्यांमध्ये होत आहे. गुजरात, आसाम, उत्तर प्रदेश, ओडिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेश येथे विविध प्रकल्प उभारले जात आहेत.
इलेक्ट्रॉनिक्सच्या घटकांच्या निर्मितीसाठीही सरकारकडे 249 प्रस्ताव आले आहेत. यामध्ये प्रिंटेड सर्किट बोर्ड, कॅपेसिटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटकांचा समावेश आहे.
गुजरातमध्ये मोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प
गुजरातमध्ये Micron Technology सुमारे ₹22,516 कोटींच्या गुंतवणुकीतून DRAM आणि NAND उत्पादनाच्या टेस्टिंग व पॅकेजिंगशी संबंधित युनिट उभारत आहे. या युनिटची आठवड्याला सुमारे 1.4 कोटी युनिट्सची क्षमता असण्याचे सांगण्यात आले आहे.
Tata Electronics आणि तैवानची PSMC कंपनी यांच्या सहकार्याने गुजरातमध्ये सुमारे ₹91,526 कोटींचा चिप उत्पादन प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पातून दर महिन्याला 50 हजार वेफर्स तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
वेफर म्हणजे सेमीकंडक्टरची अतिशय पातळ प्लेट, ज्यावर अनेक चिप्स तयार केल्या जातात.
आसाममध्ये पॅकेजिंग युनिट
Tata Electronics आसाममध्ये सुमारे ₹27,120 कोटींचे पॅकेजिंग युनिट उभारत आहे. या प्रकल्पातून दररोज सुमारे 4.8 कोटी युनिट्स तयार करण्याची क्षमता अपेक्षित आहे.
गुजरातमध्ये CG Power आणि Kaynes Technology देखील अनुक्रमे सुमारे ₹7,584 कोटी आणि ₹3,307 कोटींच्या प्रकल्पांवर काम करत आहेत.
उत्तर प्रदेश ते आंध्र प्रदेशपर्यंत प्रकल्प
उत्तर प्रदेशमध्ये Vama Sundari Investments आणि Foxconn India यांच्याकडून सुमारे ₹3,706 कोटींचा प्रकल्प उभारला जात आहे. डिस्प्ले तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या चिप्सशी संबंधित उत्पादन येथे होणार आहे.
ओडिशामध्ये 3D Glass Solutions आणि SiCSem यांचे अनुक्रमे सुमारे ₹1,943 कोटी आणि ₹2,066 कोटींचे प्रकल्प आहेत.
पंजाबमध्ये Continental Device India सुमारे ₹117 कोटींच्या गुंतवणुकीतून आपल्या युनिटचा विस्तार करत आहे.
तर आंध्र प्रदेशात Advanced System in Package Technologies कडून सुमारे ₹480 कोटींची सेमीकंडक्टर युनिट उभारली जात आहे.
सेमीकंडक्टर उद्योगातून रोजगाराच्या संधी
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राचा विस्तार झाल्याने रोजगाराच्या संधीही वाढल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
सरकारी अंदाजानुसार इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सुमारे 25 लाख लोक जोडले गेले आहेत. यापैकी जवळपास 12 लाख रोजगार मोबाइल फोन उत्पादनाशी संबंधित आहेत.
यामध्ये उत्पादन केंद्रांमधील रोजगारासोबतच वाहतूक, लॉजिस्टिक्स, वितरण आणि सप्लाय चेनशी संबंधित कामांचाही समावेश होतो.
अमेरिका, जपानसह अनेक देशांशी सहकार्य
सेमीकंडक्टर उद्योगासाठी केवळ उत्पादन प्रकल्प उभारणे पुरेसे नसून, त्यासाठी आवश्यक घटक आणि तंत्रज्ञानाची पुरवठा साखळी मजबूत करणेही महत्त्वाचे आहे.
यासाठी भारताने अमेरिका, जपान, युरोपियन युनियन, सिंगापूर आणि नेदरलँड्ससोबत सहकार्य वाढवले आहे.
भारताच्या टेक सेक्टरमध्ये पुढचा टप्पा काय?
मोबाइल उत्पादन, डिजिटल सेवा, 5G आणि इलेक्ट्रॉनिक्सनंतर आता सेमीकंडक्टर उत्पादनाकडे भारताचे लक्ष आहे. चिप डिझाइनपासून उत्पादन आणि पॅकेजिंगपर्यंत संपूर्ण इकोसिस्टम देशात उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आता मंजूर झालेल्या प्रकल्पांचे उत्पादन प्रत्यक्षात किती वेगाने सुरू होते, रोजगाराच्या किती संधी निर्माण होतात आणि भारताची जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीतील भूमिका किती वाढते, हे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

