Cotton Price 2026: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदा दिलासादायक संकेत मिळत आहे. जागतिक बाजारात कापसाची मागणी उत्पादनापेक्षा अधिक राहण्याची शक्यता असून, त्यामुळे भारतीय कापसाच्या दराला आधार मिळू शकतो.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम काहीसा आशादायी ठरण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात कापूस खरेदीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या टप्प्यात बाजारपेठेत कापसाची आवक वाढताना दिसत आहे. जिनिंग कारखाने आणि बाजार समित्यांमध्ये व्यवहारांना वेग येऊ लागला आहे.
यंदा राज्यातील काही भागांत कापसाचे क्षेत्र कमी झाले आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत अतिवृष्टीचा परिणाम कमी झाल्याने उपलब्ध कापसाची गुणवत्ता चांगली राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दर्जेदार कापसाला बाजारात चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
जागतिक पातळीवरील आकडेवारीकडे पाहिल्यास मागणी आणि उत्पादनामध्ये यंदा मोठी (Cotton Price Maharashtra) तफावत निर्माण होण्याची शक्यता आहे. जगभरात अंदाजे 11 कोटी 73 लाख गाठी कापूस उपलब्ध होण्याची शक्यता असताना सूत उद्योगाकडून जवळपास 12 कोटी 29 लाख गाठींची गरज भासू शकते. त्यामुळे उत्पादनाच्या तुलनेत जवळपास 50 लाख गाठींची कमतरता निर्माण होण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा: UPI फ्री ठेवण्यासाठी 20 हजार कोटींचा खर्च, मग सरकार शुल्क का लावतंय? जाणून घ्या संपूर्ण गणित
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची गरज
याशिवाय मागील हंगामातील शिल्लक साठाही मर्यादित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची गरज वाढल्यास भारतातून निर्यातीला चालना मिळू शकते. बांगलादेश आणि व्हिएतनामसारख्या देशांमध्ये भारतीय कापसाला बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे.
कापसाचे दर
जळगावच्या बाजारात हंगामाच्या (Jalgaon Cotton Market) सुरुवातीलाच कापसाने सुमारे 8,500 रुपयांपर्यंत मजल मारली आहे. मागील वर्षाच्या सुरुवातीला असलेल्या दराच्या तुलनेत यंदाचा भाव सुमारे अडीच हजार रुपयांनी अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
आगामी काळात जागतिक बाजारपेठेतील मागणी, कापसाचा दर्जा आणि निर्यातीची स्थिती यावर दराची दिशा अवलंबून राहणार आहे. या सर्व बाबी अनुकूल राहिल्यास कापूस उत्पादकांना यंदाच्या हंगामात चांगल्या दराची अपेक्षा ठेवता येऊ शकते.




