AI Water Usage : आपण मोबाईल हातात घेऊन आपण जेव्हा chatgpt वर AI फोटो बनवतो किंवा चॅटजीपीटीला वेगवेगळे प्रश्न विचारतो , तेव्हा आपल्याला वाटतं की सगळं कसं डिजिटल चाललंय… पण या डिजिटल क्रांतीच्या मागे आपलं तहान भागवणारं पाणी कमी होत आहे… एआयच्या वाढत्या वापरामुळे जगात आणि भारतात पाणीटंचाईचे भयंकर संकट उभे राहिले आहे.
बऱ्याच जणांना वाटेल, एआय म्हणजे तर कॉम्प्युटर प्रोग्राम, मोबाईलमधलं सॉफ्टवेअर, याचा आणि पाण्याचा काय संबंध? कॉम्प्युटर काय पाणी पितो का? तर कॉम्प्युटर पाणी पीत नाही, पण त्याला जिवंत ठेवण्यासाठी पाणी पाजावं लागतं.जेव्हा आपण च्याटजीपीटी किंवा गुगल जेमिनीवर एक साधा प्रश्न टाईप करतो, तेव्हा तो प्रश्न महाकाय डेटा सेंटर्सकडे जातो. हे डेटा सेंटर्स म्हणजे काय असतात? सोप्या भाषेत सांगायचं तर, एका मोठ्या कारखान्यासारखी इमारत, ज्याच्यामध्ये हजारो, लाखो हाय-स्पीड कॉम्प्युटर्स ज्यांना आपण सर्व्हर्स म्हणतो रात्रंदिवस, २४ तास चालू असतात. आणि ते प्रचंड गरम होत असतात, जर हे सर्व्हर्स वेळेत थंड केले नाहीत, तर ते जळून खाक होतील, सिस्टीम क्रॅश होईल आणि अख्खं इंटरनेट ठप्प पडेल. या महाकाय कॉम्प्युटर्सची आग शांत करण्यासाठी आणि त्यांना थंड ठेवण्यासाठी सगळ्यात स्वस्त आणि मस्त उपाय कोणता आहे? तर गोडं आणि शुद्ध पाणी! बस, इथूनच सुरू होतो पाण्याचा हा महाभयंकर खेळ.
पाणी नेमकं जातं कुठे? ( AI Water Usage )
सर्वर थंड ठेवण्यासाठ एसी का वापरत नाहीत? तर एसी वापरतात, पण एसी प्रचंड वीज खातो. एआय जी उष्णता तयार करतो, ती बाहेर काढायला फक्त एसी पुरत नाही. म्हणून पाण्याचा वापर केला जातो. पाण्याचा वापर प्रामुख्याने दोन प्रकारे होतो,
पहिला प्रकार असतो कुलर पद्धत, डेटा सेंटरच्या आत बाहेरची गरम हवा आणली जाते आणि ती पाण्याच्या ओल्या पडद्यांमधून सोडली जाते. पाणी हवेतल्या उष्णतेला शोषून घेतं आणि बाष्पीभवन होतं. हवा थंड होते आणि सर्व्हर्स रूममध्ये जाते. पण यात लफडा असा आहे की, जे पाणी हवेत वाफ होऊन उडून गेलं, ते संपलं, त्याचा पुन्हा वापर करता येत नाही. या पद्धतीत रोज लाखो लिटर नवीन गोडं पाणी ओतावं लागतं.
आणि दुसरा प्रकार आहे गाडीच्या रेडिएटरसारखी पद्धत – यात सर्व्हर्सच्या बाजूने तांब्याच्या किंवा स्टीलच्या पाईप्स फिरवलेल्या असतात. या पाईप्समधून थंड पाणी सोडतात. हे पाणी सर्व्हर्सची उष्णता स्वतःमध्ये शोषून घेतं आणि गरम होतं. मग हे गरम पाणी बाहेरच्या कूलिंग टॉवरमध्ये जातं, तिथे त्याला थंड केलं जातं आणि पुन्हा आत पाठवलं जातं. यात पाण्याचा पुनर्वापर होतो खरा, पण तरीही मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जातंच. जगातील मोठ्या युनिव्हर्सिटीज आणि खुद्द टेक कंपन्यांनी काही अवहाल दिलेत, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, रिव्हरसाइड मधील संशोधक डॉ. शाओलेई रेन यांच्या टीमने अभ्यास करून जगाला सांगितलं की, आपण जेव्हा चॅटजीपीटीला १० ते ५० साधे प्रश्न विचारतो, तेव्हा त्याच्या सर्व्हर्सना थंड करण्यासाठी अर्धा लिटर शुद्ध पाणी लागते. म्हणजे आपण चॅट gpt वर दोन मिनिटे जरी असलो तरी तिथे पाण्याची बॉटल रिकामी होतेय, म्हणजे लिटरभर पाणी use होतंय…
हेही वाचा : लालबाग राजाच्या VIP दर्शनासाठी किती पैसे लागतात? काय प्रोसेस असते?
GPT-3 ट्रेनिंगमध्ये किती पाण्याचा वापर झाला?
जेव्हा ओपनएआय कंपनीने GPT-3 नावाचं एआय मॉडेल बनवलं आणि त्याला शिकवलं , तेव्हा मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरमध्ये तब्बल ७ लाख लिटर गोड्या पाण्याचा वापर झाला. आणि जर त्या कॉम्प्युटर्सना लागणारी वीज तयार करताना जे पाणी वापरलं, तेही हिशोबात धरलं, तर हा आकडा ५४ लाख लिटर एवढा मोठा होतो… आता हे झालं एआय टूल्सचं. पण गुगलने स्वतः मान्य केलंय की, त्यांच्या डेटा सेंटर्सनी एका वर्षात तब्बल ४१ अब्ज लिटर पाणी फस्त केलंय. हा वापर मागच्या वर्षापेक्षा ३४ टक्क्यांनी वाढलाय. मायक्रोसॉफ्टने देखील कबूल केलंय की, त्यांच्या डेटा सेंटर्सचा वार्षिक पाण्याचा वापर ८ अब्ज लिटरच्या पुढे गेला आहे.
ही झाली जगाची गोष्ट. एक सामान्य गुगल सर्च करायला जेवढं पाणी लागतं, त्याच्या १,६०० पटीने जास्त पाणी एआयचा एक प्रश्न सोडवायला लागतं. आज अख्खं जग एआयच्या मागे वेडं झालंय, मग पाण्याचा किती चुराडा होत असेल….
भारतामध्ये डेटा सेंटरचा पाणीवापर किती आहे? ( AI Water Usage )
आता येऊया आपल्या मायभूमीवर, म्हणजेच भारतात.भारतात सध्या डिजिटल क्रांतीचा पूर आलाय. प्रत्येकाच्या हातात 5G मोबाईल आहे. यामुळे भारतात डेटा सेंटर्स उभारण्याची स्पर्धाच लागली आहे. मुंबई, पुणे, चेन्नई, बंगलोर, हैदराबाद आणि नोएडा ही शहरे आता भारताचे डेटा सेंटर हब बनली आहेत.
पण यात सगळ्यात मोठी धोक्याची घंटा काय आहे माहितीये का? भारतातील डेटा सेंटर्स सध्या दरवर्षी सुमारे १५० अब्ज लिटर पाणी वापरत आहेत. आणि २०२६-२०३० पर्यंत हा आकडा रॉकेटसारखा वर जाणार आहे. आपल्याकडे उन्हाळ्यात तापमान ४० ते ४५ अंश पार करतं. जेव्हा बाहेर एवढी उष्णता असते, तेव्हा डेटा सेंटर्सच्या मशिन्सना थंड ठेवण्यासाठी पाण्याचा वापर ६ ते १० पटीने वाढतो. डेटा सेंटर्सना थंड करण्यासाठी नदीचे, विहिरीचे किंवा समुद्राचे पाणी चालत नाही. त्यांना डिमिनरलाईज्ड म्हणजेच अत्यंत शुद्ध, क्षारांशिवाय असलेले गोडे पाणी लागते. जर पाण्यात क्षार असतील, तर पाईप्समध्ये गंज चढेल किंवा क्षार साठून मशिन्स ब्लॉक होतील.
बंगलोर किंवा चेन्नई सारख्या शहरांमध्ये उन्हाळ्यात माणसांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या लाईनमध्ये उभे राहावे लागते. तिथे भूजल पातळी आधीच आटली आहे. अशा परिस्थितीत जर हे महाकाय डेटा सेंटर्स जमिनीतून लाखो लिटर शुद्ध पाणी खेचत असतील, तर तिथल्या स्थानिक लोकांचे काय होणार? ज्या पाण्याचा वापर शेतीसाठी किंवा पिण्यासाठी व्हायला हवा, ते पाणी एआय सर्व्हर्सना थंड करण्यासाठी वापरला जात आहे.
तर हा सगळा खेळ असा चाललाय. आपण स्क्रीनवर जेवढी चमकधमक पाहतो, त्याच्या मागे निसर्गाचा तितकाच मोठा बळी दिला जातोय. एआय हे आपल्या भविष्यासाठी गरजेचं आहे, यात शंकाच नाही. पण हे एआय चालवायला अब्जावधी लिटर पाण्याचा वापर होत आहे, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एआयला टाईमपास म्हणून १०-१२ विचारणार, तेव्हा नक्की आठवा की तुमच्या एका क्लिकमुळे कुठेतरी पाण्याचा अर्धा लिटरचा तांब्या रिकामा झालाय….






