Dattatray Sawant : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोलापूर येथे झालेल्या शिक्षक मेळाव्यात माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, ते कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढणार, याबाबतचा निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही. सावंत यांनी भाजप तसेच महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असून सुमारे ५२ हजार ८०० शिक्षक मतदार या मतदारसंघात आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध इच्छुकांकडून मतदारांशी संपर्क आणि संघटनात्मक तयारी सुरू झाली आहे.
दत्तात्रय सावंत यावेळी अपक्ष म्हणून मैदानात उतरणार नाहीत ( Dattatray Sawant )
मागील निवडणुकीत दत्तात्रय सावंत यांनी अपक्ष लढून तब्बल 12800 प्रथम पसंतीची मते मिळवली होती. निसटत्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. मात्र यावेळी शिक्षकांच्या इच्छेखातर आपण पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे सावंत महायुतीकडून मैदानात उतरणार की महाविकास आघाडीचा पर्याय स्वीकारणार, याकडे शिक्षक मतदारसंघातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सावंत यांची या मतदार संघात मोठी ताकत आहे. 2014 साली ते अपक्ष म्हणुन या मतदार संघातून निवडून आले होते. 2020 साली निसटता पराभव झाल्यानंतरही त्यांनी पुन्हा पाच जिल्ह्यांचा मतदार संघ पिंजून काढला आहे. शिक्षकांशी थेट संपर्क असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे..
सोलापूरमधील मेळाव्यात शिक्षक मतदार यादी आणि मतदार नोंदणीशी संबंधित मुद्द्यांवर सावंत यांनी भूमिका मांडली. 2020 साली निवडणुकीत कात्रज या ठिकाणी 5000 जणांची शिक्षक नसताना बोगस नोंदणी केली गेली, शिक्षकांवर दबाव आणला गेला, या निवडणुकीतही आपण 3000 बोगस नोंदणी निवडणुक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे, व ती डिलीट करण्याचे काम सुरू आहे, शिक्षकांच्या मतदार संघात बोगस नोंदणी आपण यावेळी खपवून घेणार नाही अशी भूमिका सावंत यांनी मांडली आहे.
हेही वाचा : गरब्यासाठी ‘पार्टनर भाड्याने’? 1 ते 5 हजारांच्या जाहिरातीने खळबळ; महाराष्ट्रातही वाद









