• Home
  • ताज्या बातम्या
  • गावात बाप्पाचा उत्सव अन् शेताच्या बांधावर घडली काळजाचा ठोका चुकवणारी घटना
गुन्हा

गावात बाप्पाचा उत्सव अन् शेताच्या बांधावर घडली काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Hingoli Farmer Suicide
8

गजानन पवार | हिंगोली प्रतिनिधी

Hingoli Farmer Suicide : जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेतकरी आत्महत्यांच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत. हिंगोली तालुक्यातील ईसापूर गावात एका अल्पभूधारक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील बांधावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विठ्ठल वाढवे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

ईसापूरमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर ( Hingoli Farmer Suicide )

मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल वाढवे हे अल्पभूधारक शेतकरी होते. यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप पिकांवर संकट ओढावले आहे. पावसाअभावी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, या परिस्थितीचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. अशातच वाढवे यांनी आपल्या शेतातील बांधावर गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली. पतीचा मृतदेह पाहताच पत्नीने टाहो फोडला. कुटुंबीयांच्या आक्रोशाने घटनास्थळी वातावरण अत्यंत भावूक झाले. आईचा आक्रोश पाहून मृत शेतकऱ्याचा चिमुकला मुलगाही धाय मोकलून रडू लागला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : बिहारच्या जमुईत अल्पवयीन जोडप्याला अडवून छेडछाड; मुख्य आरोपी नंदन यादवला पोलिसांची गोळी

पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान ( Hingoli Drought )

विठ्ठल वाढवे यांच्या पश्चात पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात गावातील वातावरण आनंदी असतानाच वाढवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिके वाळत आहेत. सोयाबीन, कापूस, तूर , हळद यासह विविध पिकांवर दुष्काळाचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ईसापूर येथील विठ्ठल वाढवे यांच्या आत्महत्येने पुन्हा एकदा शेतकरी संकटाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, गेल्या वीस दिवसांत हिंगोली जिल्ह्यातील हा सहावा शेतकरी आत्महत्येचा बळी ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी करून कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts