Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • एकाच दिवशी दोन लाच प्रकरणं! शिरूरमध्ये एका हवालदाराला अटक, दुसऱ्याचा शोध सुरू
गुन्हा

एकाच दिवशी दोन लाच प्रकरणं! शिरूरमध्ये एका हवालदाराला अटक, दुसऱ्याचा शोध सुरू

Shirur Police Bribe
35

सचिन धुमाळ | शिरूर प्रतिनिधी

Shirur Police Bribe : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाचखोरीच्या दोन धक्कादायक घटना एकाच दिवशी समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत पोलीस ठाण्याबाहेर ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार शिवाजी बनकर याला रंगेहाथ पकडले, तर दुसऱ्या कारवाईत ९५ हजार रुपयांची लाचेची रक्कम घेऊन पोलीस हवालदार सतीश मुंढे हा कारवाईची चाहूल लागताच टाकळी हाजी पोलीस चौकीतून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.

शिरूरमध्ये एकाच दिवशी लाचखोरीच्या दोन घटना ( Shirur Police Bribe )

पहिल्या प्रकरणात तक्रारदार आणि त्यांच्या आई-वडिलांना अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी हवालदार शिवाजी बनकर याने १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर तडजोडीत ११ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले.

यानंतर एसीबीने शिरूर पोलीस ठाण्याबाहेर सापळा रचला. या सापळ्यात ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिवाजी बनकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याच दिवशी दुसऱ्या प्रकरणातही धक्कादायक प्रकार समोर आला. तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना अटक न करण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी पोलीस हवालदार सतीश मुंढे याने सुरुवातीला एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर ९५ हजार रुपये देण्याचे ठरले.

हेही वाचा : महाराष्ट्राच्या बातम्यांना डिजिटल व्यासपीठ देणारे LS Marathi; जाणून घ्या या मराठी न्यूज चॅनेलबद्दल

अटक न करण्यासाठी ₹15 हजारांची मागणी केल्याचा आरोप ( Shirur Police )

तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, एसीबीच्या कारवाईची चाहूल लागताच सतीश मुंढे याने लाचेची रक्कम घेऊन टाकळी हाजी पोलीस चौकीतून पळ काढल्याचे समोर आले आहे. या प्रकरणीही एसीबीने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एकाच पोलीस ठाण्याच्या हद्दीत, एकाच दिवशी लाचखोरीच्या दोन घटना समोर आल्याने शिरूर तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या प्रकरणात एसीबीच्या कारवाईची चाहूल आरोपीला नेमकी कशी लागली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे. शिरूर तालुक्यात यापूर्वीही पोलीस तसेच महसूल विभागातील लाचखोरीच्या कारवाया समोर आल्या आहेत. त्यामुळे एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांनी संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts