Navratri 2026 Kolhapur: शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. लाखो भाविकांच्या संभाव्य गर्दीचा विचार करून पार्किंग, वाहतूक, स्वच्छता आणि सुरक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. जाणून घ्या संपूर्ण प्लॅन
शारदीय नवरात्रोत्सावाचा पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात (Navratri 2026 Kolhapur) दाखल होणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. उत्सवाच्या काळात वाहतूक, स्वच्छता, सुरक्षा, पार्किग (Kolhapur Parking Plan) आणि आरोग्य व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.
नवरात्रोत्सवाच्या (Kolhapur Navratri Festival) तयारीच्या आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, महापालिका उपयुक्त पारितोष कंकाळ आणि मंदिर समितीच्या सचिव वर्षा साळोखे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नियुक्त कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्याचे निर्देश
उत्सवाच्या काळात विविध ठिकाणी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता प्रशासनातील सर्व विभागांनी आपापली जबाबदारी स्पष्टपणे पार पाडावी आणि आवश्यकतेनुसार परस्पर समन्वय ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.
स्वच्छता आणि अतिक्रमणावर विशेष लक्ष
नवरात्रोत्सवाच्या काळात शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे महापालिकेने प्रदक्षिणा मार्गासह प्रमुख रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष स्वच्छता व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले.
रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याबरोबरच कचरा संकलनासाठी शिफ्टनुसार नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. महापालिका आयुक्त डॉ. भारूड यांनी मंगळवारपासून विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
अन्नपदार्थ आणि प्रसादाच्या गुणवत्तेची तपासणी
उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविक प्रसाद आणि खाद्यपदार्थांचे सेवन करतात. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने प्रसादाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्यावे आणि आवश्यक तपासण्या कराव्यात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अग्निसुरक्षेचीही तपासणी
भाविकांची मोठी गर्दी होणाऱ्या ठिकाणी अग्निसुरक्षेच्या उपाययोजना सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठी अग्निशमन विभागाने संबंधित ठिकाणांचे फायर ऑडिट करून आवश्यक त्या उपाययोजना पूर्ण कराव्यात, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
हेही वाचा : शिष्याचा मृत्यू, तिघे बेपत्ता अन् आश्रमाबाहेर आंदोलन; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात नेमकं काय सुरू?
गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचे नियोजन
मंदिर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर समिती आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे नियोजन करावे. भाविकांच्या हालचाली सुलभ राहण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात यावे, अशी मागणी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केली.
वाहन पार्किंगसाठी विशेष व्यवस्था
नवरात्रोत्सवाच्या काळात शहरातील वाहतूक आणि वाहन पार्किंगचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी पोलिसांनी कठोर नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले.
विशेषतः दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी उपलब्ध असलेल्या पार्किंगच्या ठिकाणांची माहिती भाविकांना सहज उपलब्ध व्हावी, यावर बैठकीत चर्चा झाली. यावेळी पोलीस विभागाने शहरातील विविध वाहनतळांची ठिकाणे आणि प्रस्तावित पार्किंग व्यवस्थेचे सादरीकरणही केले.
नवरात्रोत्सव काळात कोल्हापुरात मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, क्रांतीकुमार मिरजकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




