Pune । अमोल धर्माधिकारी, प्रतिनिधी
Pune Crime News: गणेश विसर्जनाच्या गर्दीत भाविकांना घेरून कटरने सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. उत्तर प्रदेशातून एका आरोपीला अटक करण्यात आली असून, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेत भाविकांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा फरासखाना पोलिसांनी (Pune Police) पर्दाफाश केला. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील विजयपाल कवर सैन याला अटक(Ganesh Visarjan Theft) करण्यात आली असून, त्याच्याकडून २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत सोन्याची चैन आणि मंगळसूत्र चोरीचे एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
गर्दीत भाविकांना घेरून चोरी
गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या सागर कोमटी यांना २५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे पावणेअकराच्या सुमारास बुधवार चौकातील बेलबाग चौकाजवळ सहा जणांच्या टोळीने घेरल्याची घटना घडली होती. आरोपींनी त्यांना मारहाण करून चाकूचा धाक दाखवला आणि लोखंडी कटरच्या सहाय्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन कापून मोबाईलसह मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार होती.
उत्तर प्रदेशातून आरोपीला अटक
या गुन्ह्याचा तपास करताना फरासखाना पोलिसांना आरोपी विजयपाल आणि त्याच्या अन्य पाच साथीदारांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. पोलिस हवालदार गजानन सोनुने आणि पोलिस अंमलदार चेतन होळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन विजयपाल याला ताब्यात घेतले.
हेही वाचा: १७ ऑक्टोबर! आजपासून सूर्याचे राशी परिवर्तन; पुढील ३० दिवस या ४ राशींनी घ्यावी काळजी
सोन्याचे दागिने, मोबाईल आणि कटर जप्त
आरोपीकडून १३९.७२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल फोन, धारदार चाकू आणि लोखंडी कटर असा एकूण २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे सोन्याची चैन आणि मंगळसूत्र चोरीचे एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संजय दराडे आणि परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. फरासखाना पोलिस ठाण्याचे प्रभारी संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.









