खेड । चंद्रकांत मांडेकर, प्रतिनिधी
RTO Challan APK Fraud: वाहनावरील दंडाचे आरटीओ चलान आल्याचे भासवून व्हॉट्सॲपवर एपीके (APK) फाईल पाठवून मोबाईल हॅक करत बँक खात्यावर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्यीय सायबर भामट्यांच्या मुसक्या आळंदी पोलिसांनी (Alandi Police) आवळल्या आहेत. सायबर गुन्ह्यांचे केंद्र मानल्या जाणाऱ्या झारखंडमधील जामतारा परिसरातून (Jamtara Cyber Gang) मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने भाजीपाला वाहतूक करणाऱ्या एका ५० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ५० लाख रुपयांची मुदत ठेव मोडून तब्बल २४ लाख ३५ हजार ५८३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती.
नेमकी घटना काय?
तक्रारदार ज्येष्ठ नागरिक महिन्द्रा पिकअप वाहन चालवून भाजी मार्केटमध्ये भाजीपाला वाहतुकीचे काम करतात. त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘आरटीओ चलान’ (RTO Challan Scam)नावाची एक एपीके फाईल आली होती. आपल्या वाहनावर काही दंड/चलान आहे का, हे पाहण्यासाठी त्यांनी ती फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड (इन्स्टॉल) केली. फाईल डाऊनलोड होताच त्यांचा मोबाईल अचानक बंद पडला. तंत्रज्ञानाची विशेष माहिती नसल्याने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दोन दिवसांनंतर मोबाईल सुरू झाल्यावर बँक खात्यातून मोठी रक्कम कपात झाल्याचे मेसेज आले. बँकेत जाऊन तपासणी केली असता, त्यांची ५० लाख रुपयांची मुदत ठेव (एफडी) मोडून त्यातील २४ लाख ३५ हजार ५८३ रुपये विविध अनोळखी बँक खात्यांवर वर्ग करण्यात आल्याचे उघड झाले. पुढील फसवणूक टाळण्यासाठी बँकेने तातडीने त्यांचे खाते होल्ड केले आणि आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
क्रेडिट कार्ड रिन्यूअल ते मोबाईल हॅकिंग
- पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि बँक खात्यांचा मागोवा घेतला असता या गुन्ह्याची धक्कादायक पद्धत समोर आली:
आरोपी विनोद मंडल हा क्रेडिट कार्डची मुदत संपलेल्या किंवा वेळेत बिल भरू न शकणाऱ्या गरजू क्रेडिट कार्डधारकांचा शोध घ्यायचा. - ‘आम्ही तुमचे पेमेंट करून क्रेडिट कार्ड रिन्यू करून देतो आणि मुदत वाढवून देतो’, असे सांगून तो त्यांचे क्रेडिट कार्ड मिळवायचा व मुख्य आरोपी विष्णू प्रसाद वर्मा याच्याकडे सोपवायचा.
- वर्मा हा एपीके फाईलद्वारे नागरिकांचे मोबाईल हॅक करून त्यांच्या बँक खात्यातील चोरलेली रक्कम या क्रेडिट कार्डांमध्ये वर्ग करायचा आणि काही वेळातच विविध माध्यमांतून ती रक्कम काढून घेत असे.
पोलिसांच्या पथकाने झारखंडमधील मुफसील पोलीस ठाणे, गिरीडीह येथून दोघांना बेड्या ठोकल्या असून न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड मिळवून त्यांना खेड न्यायालयात हजर केले असता, १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून २ मोबाईल, ५ क्रेडिट कार्ड, २ क्रेडिट कार्ड झेरॉक्स, एसबीआय बँक स्टेटमेंट आणि पासवर्ड लिहिलेली कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
अटक करण्यात आलेले आरोपी
१) विष्णुप्रसाद प्रसादी वर्मा (वय २५ वर्षे, व्यवसाय – शेती, रा. देवपूर, पो. स्टे. पर्वतपुर, ता. अहिल्यापूर, जि. गिरीडीह, झारखंड – मुख्य सूत्रधार), २) विनोद एतवारी मंडल (वय ४२ वर्षे, रा. तिलकोडीह, ता. भेलवाघाटी, जि. गिरीडीह, झारखंड – सहआरोपी)
हेही वाचा: सोलापुरात खळबळ! महापालिकेच्या आरोग्य केंद्रात मावा निर्मितीचा प्रकार उघड, आयुक्तांचे कारवाईचे आदेश
तपासी अधिकारी व अंमलदार (कारवाई करणारे पथक):
सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. नरके, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके, मपोहेका आरती निकम, पोशी सोळंके, पोशी जगताप, सहाय्यक पोलीस फौजदार राजू जाधव आणि मपोशि अरुणा खंबारे यांनी केली.
पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे मिळणाऱ्या अनोळखी APK फाईल्स डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नयेत. तसेच क्रेडिट कार्डचे नूतनीकरण करून देण्याचे किंवा त्याची मुदत वाढवण्याचे आश्वासन देणाऱ्या अनोळखी व्यक्तींना कार्ड देणे टाळावे. अशा कार्डांचा वापर सायबर गुन्ह्यांतून मिळवलेली रक्कम वळवण्यासाठी केला जाऊ शकतो, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
— मारुती जगताप, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-३, पिंपरी-चिंचवड









