Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Uttarakhand Film Tourism : मसुरीत अक्षय कुमार, नैनितालमध्ये जाह्नवी कपूर! बॉलिवूडचं आवडतं शूटिंग डेस्टिनेशन बनतंय ‘हे’ राज्य!
मनोरंजन

Uttarakhand Film Tourism : मसुरीत अक्षय कुमार, नैनितालमध्ये जाह्नवी कपूर! बॉलिवूडचं आवडतं शूटिंग डेस्टिनेशन बनतंय ‘हे’ राज्य!

Uttarakhand Film Tourism :
13
Uttarakhand Film Tourism : निसर्गरम्य पर्वतरांगा, धुक्याने वेढलेल्या दऱ्या, तलावांचे सौंदर्य आणि आकर्षक लोकेशन्स यांमुळे उत्तराखंड बॉलिवूडसाठी महत्त्वाचे शूटिंग डेस्टिनेशन म्हणून पुढे येत आहे. मसुरीमध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि नैनितालमध्ये अभिनेत्री जाह्नवी कपूर यांच्या शूटिंगच्या चर्चेमुळे या राज्याच्या फिल्म टुरिझमकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. चित्रपट आणि वेब सीरिजच्या शूटिंगसाठी योग्य निसर्गरम्य ठिकाणे शोधणाऱ्या निर्मात्यांना उत्तराखंडमधील पर्वतीय परिसर आकर्षित करतो.

बर्फाच्छादित पर्वतरांगा, निसर्गरम्य दऱ्या, ऐतिहासिक बाजारपेठा आणि सुंदर तलावांसाठी प्रसिद्ध असलेले उत्तराखंड आता बॉलिवूडच्या चित्रपट निर्मात्यांचेही आकर्षण ठरत आहे. सध्या अभिनेता अक्षय कुमार मसूरी आणि लँडोअर परिसरात, तर अभिनेत्री जाह्नवी कपूर नैनितालमध्ये आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्या चित्रपटांच्या शूटिंगमुळे उत्तराखंडची ओळख केवळ पर्यटनस्थळ म्हणून नव्हे, तर चित्रपट निर्मितीसाठी अनुकूल राज्य म्हणूनही अधिक मजबूत होत आहे.

मसूरीत (Mussoorie) अक्षय कुमारचा शूटिंगचा धडाका

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या मसूरी आणि लँडोअरच्या निसर्गरम्य परिसरात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दाखल झाला आहे. माहितीनुसार, अभिनेता रश्मिका नव्हे तर राशी खन्ना (Rashi Khanna) त्याच्यासोबत या आगामी कॉमेडी चित्रपटात दिसणार असून, दिग्दर्शनाची जबाबदारी अनीस बज्मी (Anees Bazmee) सांभाळत आहेत. या चित्रपटासाठी एका गाण्याचे चित्रीकरण सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मसूरीतील बाजारपेठा, रस्ते आणि डोंगराळ परिसरामुळे या शूटिंगला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे.

हेही वाचा : लग्नानंतर विजय-रश्मिका पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर; ‘रणबाली’ पाहून प्रेक्षकांनी काय दिला कौल?

नैनितालमध्ये (Nainital) जाह्नवी कपूरच्या चित्रपटाचे चित्रीकरण

दुसरीकडे, नैनितालमध्ये जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor), श्रीलीला आणि सिद्धार्थ गुप्ता (Sidharth Gupta) यांच्या आगामी रोमँटिक थ्रिलर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. उमेश बिस्ट (Umesh Bist)  या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. एकाच मुलावर प्रेम करणाऱ्या दोन मुलींच्या भावनिक गुंतागुंतीभोवती या चित्रपटाची कथा फिरत असल्याचे वृत्त आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या कलाकारांच्या शूटिंगमुळे उत्तराखंडच्या चित्रपट पर्यटनाला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चित्रपट धोरण २०२४; सात दिवसांत परवानगी देण्यावर भर

उत्तराखंड सरकारने चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘उत्तराखंड फिल्म पॉलिसी २०२४’ (Uttarakhand Film Policy) अंतर्गत चित्रीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यावर भर दिला आहे. सिंगल विंडो क्लिअरन्स व्यवस्थेद्वारे विविध विभागांच्या परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्न आहे. निर्धारित प्रक्रियेनुसार सात दिवसांत शूटिंगची परवानगी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे चित्रपट निर्मात्यांचा वेळ वाचण्यास आणि राज्यात अधिक चित्रपट प्रकल्प आकर्षित होण्यास मदत होऊ शकते.

स्थानिक रोजगार आणि पर्यटनाला मिळणार चालना?

चित्रपटांच्या चित्रीकरणाचा फायदा केवळ मनोरंजन क्षेत्रापुरता मर्यादित राहत नाही. चित्रपट युनिट्सच्या वास्तव्यामुळे हॉटेल्स, वाहतूक सेवा, खानपान व्यवसाय, स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर सेवा पुरवठादारांना कामाच्या संधी मिळू शकतात. तसेच चित्रपटांमधून मसूरी, लँडोअर आणि नैनितालचे सौंदर्य देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यास या ठिकाणी पर्यटन वाढण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही उत्तराखंडचे नैसर्गिक सौंदर्य, सांस्कृतिक वारसा आणि विविध भौगोलिक वैशिष्ट्ये चित्रपट निर्मितीसाठी अनुकूल असल्याचे म्हटले आहे. राज्याला प्रमुख फिल्म शूटिंग डेस्टिनेशन बनवण्यासोबतच स्थानिक प्रतिभांना संधी देण्यावर सरकारचा भर आहे.  एकूणच, अक्षय कुमार आणि जाह्नवी कपूर यांच्या शूटिंगमुळे उत्तराखंडच्या फिल्म टुरिझमला प्रसिद्धी मिळत असून, योग्य नियोजन आणि स्थानिक सहभागातून हे राज्य भविष्यात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मितीचे महत्त्वाचे केंद्र बनू शकते.

हेही वाचा : Salman Khan: सलमान खानच्या छातीत अचानक दुखलं अन् स्टेजवर पडला; चालू शोमध्ये नेमकं काय घडलं? व्हायरल व्हिडिओ आला समोर

img

Shivani Nagarale

Content Writer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts