• Home
  • ताज्या बातम्या
  • गोकुळच्या आखाड्यात महायुतीला धोबीपछाड! सतेज पाटलांनी कसा उलटवला डाव?
राजकारण

गोकुळच्या आखाड्यात महायुतीला धोबीपछाड! सतेज पाटलांनी कसा उलटवला डाव?

Gokul Election Result 2026
37

Gokul Election Result 2026 : कोल्हापूरच्या मातीत कुस्ती आणि राजकारण रक्ताच्या थेंबाथेंबात भिनलंय, इथं पैलवान लंगोट कसून मैदानात उतरतो, तसाच नेता खादी घालून गोकुळच्या आखाड्यात शड्डू ठोकतो. साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या, ५ हजार कोटींची उलाढाल असणाऱ्या ‘गोकुळ दूध संघाची’ निवडणूक, समोर कोण होतं? अख्खी ‘महायुती’! हसन मुश्रीफ, चंद्रकांत दादा, धनंजय महाडिक, विनय कोरे, प्रकाश आवाडे… म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणातले एकापेक्षा एक वजनी पैलवान! घोषणा होती, २५ विरुद्ध ०. बंटी पाटलांना ( Bunty Patil ) डायरेक्ट क्लिन स्वीप द्यायचा…. पण एकट्या सतेज पाटलांनी (Satej Patil) महायुतीच्या एवढ्या मोठ्या वजनी रणगाड्याला असा काही ‘धोबीपछाड’ मारला, की महायुतीचं २५-० चं स्वप्न पार भुईसपाट झालं! १३ विरुद्ध १२ ने गोकुळवर सतेज पाटलांनी गुलाल उधळला. हा डाव सतेज पाटलांनी कसा मारला? महायुतीची गणितं कुठं चुकली? आणि गोकुळच्या राजकारणात नेमकं काय शिजलं?

गोकुळ दूध संघाची निवडणूक कोल्हापूरसाठी महत्त्वाची का? ( Gokul Election Result 2026 )

पहिली गोष्ट डोक्यात घ्या… कोल्हापुरात गोकुळ म्हणजे काय? गोकुळ म्हणजे नुसता दूध संघ नाही, कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी आहे, साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकरी आणि हजारो दूध सोसायट्या या गोकुळच्या जीवावर चालतात. रोज लाखो लिटर्स दूध गोळा होतं, कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. गावागावातल्या दूध सोसायट्यांवर ज्याची सत्ता, त्याची कोल्हापूरच्या राजकारणावर पकड, गोकुळचा अध्यक्ष म्हणजे जिल्ह्यातला अर्धा मुख्यमंत्रीच समजायचा. म्हणूनच, विधानसभा जिंकणं सोपं, पण गोकुळच्या २५ जागांवर ताबा मिळवणं महाकठीण, इथं मत देणारे सामान्य लोक नसतात, तर गावाकडच्या दूध सोसायट्यांचे चेअरमन असतात. म्हणजेच, गल्लीबोळातले कसलेले राजकीय कार्यकर्ते, या मतदारांना सांभाळणं, म्हणजेच काचेच्या भांड्यात पारा पकडण्यासारखं असतं.

आता बघा, आखाडा कसा तयार झाला होता. काही वर्षांपूर्वीपर्यंत गोकुळवर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची संयुक्त सत्ता होती. पण राज्यात सत्ता बदलली, समीकरणं बदलली. हसन मुश्रीफ महायुतीत गेले. मग काय? कोल्हापुरात सतेज पाटलांना एकटं पाडण्यासाठी महायुतीने भिंत उभी केली. या भिंतीत कोण कोण होतं? हसन मुश्रीफ जे कागलचे किंगमेकर आणि सहकारातले हुकमी एक्के म्हणून समजले जातात, दुसरे धनंजय महाडिक जे बंटी पाटलांचे (Bunty Patil)पारंपरिक राजकीय कट्टर वैरी. महाडिक पॅनेल नेहमीच गोकुळमध्ये ताकदीने उतरतं. तिसरे चंद्रकांत पाटील, भाजपची दिल्ली-मुंबईतली ताकद, आणि चौथे विनय कोरे आणि प्रकाश आवाडे, पन्हाळा आणि इचलकरंजीचे स्थानिक सुभेदार…. या सगळ्यांनी मिळून राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी उभी केली. त्यांची रणनीती एकदम क्लिअर होती, बंटी पाटलांना जिल्ह्याच्या राजकारणातून कमी करायचं.. साधनं भरपूर, पैसा अफाट, सत्ता हातात, आणि कार्यकर्ते तगडे, त्यांनी जाहीर करून टाकलं, आता बंटी पाटलांना आखाड्यात जागाच ठेवायची नाही. २५ च्या २५ जागा महायुतीच जिंकणार….

हेही वाचा : गोकुळच्या सत्तेचा फैसला अखेर तीन तासांनी! सतेज पाटलांनी विजयामागचं कारण सांगत म्हणाले की…

महायुतीची ताकद आणि सतेज पाटलांची रणनीती

आता विचार करा… समोर एवढी मोठी फौज, बंटी उर्फ सतेज पाटील ( Satej Patil ) महाविकास आघाडीत एकटे पडल्यासारखे दिसत होते. पण बंटी पाटील नावाचा माणूस कोल्हापूरच्या मातीत सहज हार मानणारा नाही. बंटी पाटलांनी थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात घर केलं. अख्खी सत्ता एका बाजूला आणि तुमचा बंटी एकटा एका बाजूला, हे चित्र त्यांनी मतदारांसमोर हुशारीने उभं केलं. महायुतीत वरून सगळं आलबेल दिसत होतं, पण आतमध्ये तिकीट वाटपावरून प्रचंड नाराजी होती. मुश्रीफ, महाडिक आणि कोरे यांच्यात अंतर्गत सुंदोपसुंदी सुरू होती. बंटी पाटलांनी नेमकी याच दुखाऱ्या रगेवर बोट ठेवलं. आणि तिसरी रणनीती रणनीती, अंडरग्राउंड फिल्डिंग (क्रॉस व्होटिंग)… कोल्हापूरच्या राजकारणात याला म्हणतात आतून कीर्तन, वरून तमाशा…. बंटी पाटलांनी महायुतीच्या नाराज उमेदवारांच्या आणि सोसायट्यांच्या चेअरमनच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या. याचा परिणाम असा झाला, की मतदारांनी महायुतीच्या पॅनेलमधून बंटी पाटलांच्या उमेदवारांना गुपचूप मतं दिली, ज्याला आपण क्रॉस व्होटिंग म्हणतो….

मतदान झालं… आणि काल उजाडला मतमोजणीचा दिवस, रमणमळा परिसरातील मतमोजणी केंद्रावर जवळपास १३ तास मतमोजणी चालली. १-१ मतासाठी दोन्ही बाजूचे नेते जीव मुठीत धरून बसले होते. सतेज पाटील स्वतः मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून बसले होते. त्यांचा एकेक शिलेदार पुढे जात होता. महायुतीला घाम फुटला होता. पहिल्या फेऱ्यांमध्ये सतेज पाटलांच्या पॅनेलने मोठी आघाडी घेतली. महायुतीचे दिग्गज गळू लागले. हे बघून महायुतीच्या गोटात खळबळ उडाली. त्यांनी काही जागांवर ‘फेरमतमोजणीची’ मागणी केली. फेरमतमोजणी झाली, एका जागेवर महायुतीचे अमर पाटील विजयी झाले. त्यांनी आणखी दोन जागांवर फेरमतमोजणी मागितली. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती मागणी फेटाळली… आणि तिथेच महायुतीचा गेम ओव्हर झाला, सतेज पाटलांच्या पॅनेलने १३ जागांचा मॅजिक फिगर गाठला आणि गोकुळवर सतेज पाटलांनी गुलाल उधळला….

13-12 च्या निकालात फेरमतमोजणीची भूमिका

गोकुळच्या एकूण २५ जागांसाठी ५० उमेदवार आमनेसामने होते. ९९.९६% विक्रमी मतदान झालं होतं. बंटी पाटलांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने जनरल गटामध्ये, अभिजित प्रभाकर तायशेटे शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर, किसान बापूसो चौगुले, बाबासाहेब श्रीपति चौगुले, राहुल बजरंग देसाई, विद्याधर बाबूराव गुरबे, बाबासाहेब विष्णु देवकर, आणि विश्वजीत दिनकरराव जाधव यांनी धुव्वा उडवला.
राखीव जागांवर तर सतेज पाटलांनी डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक केला, महिला राखीव गटामध्ये, अंजना केदारी रेडेकर आणि भाग्यश्री धीरज डोंगळे या दोन्ही जागा बंटी पाटलांच्या पदरात पडल्या. इतर मागासवर्गीय (OBC) गट: शशिकांत शामराव खोत विजयी. अनुसूचित जाती गट: राजूबाबा आवळे विजयी. भटक्या-विमुक्त जमाती गट: बयाजी शेळके विजयी या राखीव पॅनेलच्या क्लिन स्वीपनेच बंटी पाटलांना बहुमताचा १३ चा आकडा गाठून दिला….

महायुतीची छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे १२ उमेदवार विजयी झाले राहुल पांडुरंग पाटील, चेतन अरुण नरके, अजित शशिकांत नरके, अंबरिशसिंह संजय घाटगे, वीरेंद्र संजय मंडलिक, मदन बाबूराव देसाई, राजेश नरसिंगराव पाटील, रणजित के. पाटील, रणजित दिलीप पाटील, आणि अजित पांडुरंग पाटील, आणि अत्यंत चुरशीच्या फेरमतमोजणीत ऐनवेळी गेम करून महायुतीचे अमरसिंह पाटील विजयी झाले, ज्यामुळे बंटी पाटलांचा १४ वा उमेदवार सचिन घोरपडे पराभूत झाला. पण तरीही महायुती १२ वरच अडकली आणि सत्ता सतेज पाटलांकडेच राहिली.

हेही वाचा : Gokul Election Result 2026: गोकुळमध्ये सतेज पाटलांचा ‘पॉवर प्ले’; १४ जागांच्या आघाडीने राजकीय समीकरणे बदलली!

गोकुळचा किंग कोण ठरला? ( Gokul Election Result )

या निवडणुकीने महायुतीचे मोठे मोठे बुजूर्ग पैलवान चितपट केले. मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ पराभूत झाले. महाडिक गटाच्या शौमिका महाडिक यांना पराभवाचा धक्का बसला. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यासारखे सहकारातले जुने जाणते गडी धोबीपछाड खाऊन पडले, स्वतः हसन मुश्रीफांनी निकाल पूर्ण लागण्याआधीच हात टेकले आणि कबुली दिली की, आमच्यातली अंतर्गत भांडणंच आम्हाला नडली… थोडक्यात सांगायचं तर, महायुतीने सतेज पाटलांना घेरण्यासाठी संपूर्ण कोल्हापुरात चक्रव्यूह रचला होता. पण सतेज पाटील अभिमन्यू ठरले नाहीत, तर त्यांनी त्या चक्रव्यूहाचे तट पोखरून काढले आणि विजय खेचून आणला. या निवडणुकीने एक गोष्ट सिद्ध केलीय, कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात अजूनही सतेज पाटील नावाच्या पैलवानाचा तोड नाही… सत्ता आणि नेत्यांची फौज कितीही मोठी असली, तरी तळागाळातील कार्यकर्त्यांवर आणि शेतकऱ्यांवर ज्याची पकड असते, तोच शेवटी गोकुळचा किंग ठरतो….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts