निलम चापुडे | जुन्नर प्रतिनिधी
Junnar Leopard Vaccine: जुन्नरमध्ये बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी देशातील पहिलाच गर्भनिरोधक लसीकरणाचा प्रयोग राबवण्यात आला आहे. या मोहिमेत दोन मादी बिबट्यांना लस देण्यात आली असून, आता या प्रयोगाच्या दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास केला जाणार आहे.
बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी ऐतिहासिक पाऊल
मानव आणि बिबट्यांमधील संघर्ष रोखण्यासाठी जुन्नर वनविभागाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक वैज्ञानिक प्रयोग हाती घेतला आहे. वाढत्या बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात पहिल्यांदाच ‘इम्युनोकॉन्ट्रासेप्शन’ म्हणजेच गर्भनिरोधक लसीकरणाचा पथदर्शी प्रकल्प (Pilot Project) सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत दोन मादी बिबट्यांना ही विशेष लस देऊन सुरक्षितपणे पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या (MoEFCC) वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत मिळालेल्या औपचारिक मंजुरीनंतर हा पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे.
हेही वाचा : Mumbai Air Pollution : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
ICMR आणि वनविभागाचा संयुक्त वैज्ञानिक प्रकल्प (Human Wildlife Conflict)
गेल्या काही वर्षांत जुन्नर आणि आसपासच्या मानवी वस्तीच्या भागात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्यांची संख्या शास्त्रीय पद्धतीने नियंत्रित करण्यासाठी जुन्नर वनविभाग, राज्य वनविभाग आणि मुंबईच्या आयसीएमआर-एनआयआरआरसीएच (ICMR-NIRRCH) यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेदरम्यान दोन्ही मादी बिबट्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता, प्राण्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेत त्यांना ही गर्भनिरोधक लस देण्यात आली. या लसीमुळे बिबट्यांच्या संप्रेरकांमध्ये (Hormones) होणारे बदल आणि लसीचा दीर्घकालीन परिणाम तपासण्यासाठी आयसीएमआर मुंबईमार्फत त्यांच्या रक्ताचे नमुने तपासले जात आहेत.
वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हा पथदर्शी प्रकल्प यशस्वीरीत्या राबवला जात असून, भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी हे पाऊल अत्यत महत्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.









