Indonesia Train Accident: इंडोनेशियात रेल्वे आणि मिनीबसचा भीषण अपघात घडला असून, या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. रेल्वेची मिनीबसला जोरदार धडक बसल्यानंतर वाहनाला आग लागली. त्यानंतर जळणाऱ्या मिनीबसला ट्रॅकवर ढकलत ट्रेन पुढे जात असल्याचे दृश्य समोर आले आहे. या अपघातात रेल्वेचे तीन कर्मचारी जखमी झाले, तर ट्रेनमधील 264 प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. स्थानिक वृत्तांनुसार मिनीबस चालकाचा मृत्यू झाला आहे.
इंडोनेशियात रेल्वे-मिनीबसची भीषण धडक (Indonesia Train Accident)
ही घटना इंडोनेशियातील उत्तर सुमात्रा प्रांतात सियंतर (Siantar) आणि डोलोक मेरांगिर रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. सियंतर एक्सप्रेस ट्रेन एका मिनीबसला रेल्वे क्रॉसिंगवर धडकली (North Sumatra Railway Accident). धडकेनंतर मिनीबस ट्रेनच्या पुढील भागाखाली अडकली आणि तिला आग लागली.
व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रेन मिनीबसला ढकलत पुढे जात असल्याचे दिसते. आगीच्या ज्वाळा आणि धुरामुळे घटनास्थळी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती.
हेही वाचा : मामाच्या मुलीशी लग्न करणाऱ्यांनी सावध व्हावे? सुप्रीम कोर्टाने केंद्राला नोटीस, नेमकं प्रकरण काय?
जळत्या मिनीबसला ढकलत ट्रेन पुढे का जात होती? (Train Minibus Collision)
रेल्वे आणि मिनीबसची धडक झाल्यानंतर ट्रेन तात्काळ थांबवणे शक्य नसते. ट्रेनचे वजन आणि वेग मोठा असल्याने आपत्कालीन ब्रेक लावल्यानंतरही ती काही अंतर पुढे जाऊ शकते.
या अपघातात मिनीबस ट्रेनच्या पुढील भागात अडकली होती. ट्रेन चालकांनी ब्रेक लावल्यानंतर ट्रेन थांबण्याच्या प्रक्रियेत पुढे गेली आणि मिनीबस ट्रॅकवर ढकलली गेली. याचदरम्यान ट्रेनच्या इंजिनाजवळ आग आणि ठिणग्या दिसल्याचे वृत्त आहे.
रेल्वेचे तीन कर्मचारी जखमी, प्रवासी सुरक्षित
या दुर्घटनेत ट्रेनमधील दोन चालक आणि एक अन्य रेल्वे कर्मचारी जखमी झाले. तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमधील 264 प्रवासी सुरक्षित होते. अपघातामुळे रेल्वे वाहतूक काही काळ थांबवण्यात आली. घटनास्थळी बचावकार्य आणि रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले. स्थानिक वृत्तांनुसार, मिनीबस चालकाचा या अपघातात मृत्यू झाला. मात्र, अपघाताच्या नेमक्या कारणाबाबत अधिकृत तपास सुरू आहे.
असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगमुळे अपघात?
प्राथमिक वृत्तानुसार, हा अपघात अशा रेल्वे क्रॉसिंगवर झाला, जिथे अधिकृत सुरक्षा व्यवस्था किंवा गेट नव्हते. अशा क्रॉसिंगवर वाहनचालकांनी रेल्वे येत आहे की नाही याची खात्री करूनच ट्रॅक ओलांडणे आवश्यक असते.
रेल्वे प्रशासनाने या घटनेनंतर अनधिकृत क्रॉसिंग बंद करण्याची आणि रेल्वे मार्गावरील सुरक्षा वाढवण्याची कार्यवाही करण्यावर भर दिला आहे.
हेही वाचा : Meta विरोधकांचे पोस्ट डिलीट करतंय? Instagram ब्लॉकिंगमागचं राजकारण काय?
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या अपघाताचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. धडक झाल्यानंतर मिनीबस पेटलेली असतानाही ट्रेन काही अंतर पुढे जात असल्याचे दृश्य अनेकांनी शेअर केले.
रेल्वे अपघातांमध्ये ट्रेनला तात्काळ थांबवणे शक्य नसते, त्यामुळे रेल्वे क्रॉसिंगवर वाहनचालकांनी विशेष काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे.









