PM Modi Meets Mithilesh Desai: दिल्लीतील रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोकणातील ‘फणसकिंग’ म्हणून ओळखले जाणारे मिथिलेश देसाई यांची भेट झाली. या भेटीत मोदी आणि देसाई यांच्यात १२ मिनिटे नेमकी काय चर्चा झाली?
दिल्लीतील रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह स्वागत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एका तरुणाची झालेली चर्चा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या तरुणाची पंतप्रधान मोदींशी ओळख करून दिली. त्यानंतर दोघांमध्ये जवळपास १२ मिनिटे संवाद झाला. (PM Modi Meets Mithilesh Desai)
पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करणारे हे तरुण रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील झापडे गावचे रहिवासी मिथिलेश हरिश्चंद्र देसाई आहेत. फणस शेती आणि त्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याच्या कामामुळे त्यांना ‘फणसकिंग’ म्हणून ओळखले जाते.
हेही वाचा: नवी कार घ्यायची तयारी? फक्त लूकवर भाळू नका; बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ ५ गोष्टी नक्की तपासा!
मोदींनी विचारला शेतीबाबत प्रश्न ( PM Modi Meets Mithilesh Desai )
मिथिलेश देसाई यांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला ते कुठून आले आणि नेमकं काय काम करतात, अशी विचारणा केली. त्यावर देसाई यांनी आपण कोकणातून आलो असून, आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या फणस शेतीच्या कामाला आपण पुढे नेत असल्याचे सांगितले.
यानंतर त्यांनी कोकणातील फणस उत्पादन, त्यातील विविध वाण आणि फणसापासून तयार होणाऱ्या उत्पादनांची माहिती पंतप्रधानांना दिली.
फणसापासून तयार होणाऱ्या उत्पादनांची माहिती
देसाई यांनी फणसाच्या कच्च्या गरापासून तयार केलेली पावडर, फणसाच्या बियांमधील प्रथिने आणि फणसापासून बनवलेले चिप्स याबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. याशिवाय फणसाच्या सालीपासून तयार केलेली बॅग आणि पासपोर्ट होल्डर यांसारख्या उत्पादनांचीही त्यांनी भेट दिली.
फणसाला केवळ फळ म्हणून न पाहता त्यापासून मोठ्या प्रमाणावर मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले.
‘फणस वर्ष’ घोषित करण्याची मागणी
भारतामध्ये फणस उत्पादनाला अधिक व्यापक व्यासपीठ मिळावे, यासाठी आगामी काळात ‘फणस वर्ष’ घोषित करावे, अशी मागणीही मिथिलेश देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याचे सांगितले.
फणसाच्या शेतीला राष्ट्रीय पातळीवर प्रोत्साहन मिळाल्यास कोकणातील शेतकऱ्यांसाठी नव्या संधी निर्माण होऊ शकतात, असा त्यांचा विश्वास आहे.
शरद पवारांमुळे मोदींसोबत संवादाची संधी
या भेटीबाबत बोलताना मिथिलेश देसाई यांनी शरद पवार यांचे विशेष आभार मानले. पवार गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या शेतीच्या कामाची दखल घेत असून, कृषी क्षेत्रात मार्गदर्शन करत असल्याचे देसाई यांनी सांगितले.
पवार यांनीच या कार्यक्रमात आपली पंतप्रधान मोदींशी ओळख करून दिली आणि आपल्या कामाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.
एकाच शेतात फणसाच्या 88 वाणांचे संवर्धन
मिथिलेश देसाई यांनी राहुरी कृषी विद्यापीठातून शिक्षण घेतले असून ते कृषी अभियंता आहेत. त्यांच्या शेतात फणसाच्या तब्बल 88 विविध वाणांचे संवर्धन केले जात असल्याचे ते सांगतात.
फणसाच्या विविध जातींचे जतन, उत्पादनातील प्रयोग आणि फणसापासून नवीन उत्पादने तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे कोकणातील या दुर्लक्षित पिकाकडे नव्याने लक्ष वेधले गेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या या चर्चेमुळे आपल्या गावापासून संपूर्ण महाराष्ट्रातील फणस शेतीला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळण्याची अपेक्षा मिथिलेश देसाई यांनी व्यक्त केली आहे.









