Today Stock Market : जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. बीएसई सेन्सेक्स अखेर 982.29 अंकांच्या मोठ्या घसरणीसह 76,681.29 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी देखील 275.10 अंकांनी घसरुन 23,897.95 वर आला. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरु असलेली विक्री आणि आयटी स्टॉक्समधील मोठी घसरण यामुळं गुंतवणूकदारांच्या भावनांवर दबाव आला. भू-राजकीय अनिश्चिततेचाही बाजारावर परिणाम झाला.
हेही वाचा : दोन-तृतीयांश खासदारांसह राघव चड्ढांनी गंभीर आरोप सोडला आम आदमी पक्ष;
तज्ज्ञांचं मत काय :
पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव, कच्च्या तेलाच्या किमतींमधील मोठी वाढ आणि रुपयाचं अवमूल्यन यामुळं भारतीय शेअर बाजार दबावाखाली राहिला. अपेक्षेपेक्षा कमकुवत तिमाही निकालांमुळं आयटी स्टॉक्समध्ये सर्वाधिक घसरण झाली, तर जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव जाणवला. जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते, काही काळाच्या गुंतवणुकीनंतर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आता पुन्हा निव्वळ विक्रीकडे वळले आहेत, ज्यामुळे बाजाराच्या भावनांवर नकारात्मक परिणाम झाला आहे.
सलग पाचव्या दिवशी रुपया कमकुवत :
शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया सलग पाचव्या दिवशी 22 पैशांनी कमकुवत होऊन 94.23 (तात्पुरता) अंकांवर बंद झाला. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती आणि मजबूत डॉलरमुळं रुपयावर दबाव कायम राहिला, तर पश्चिम आशियातील शांतता चर्चेवरील अनिश्चिततेमुळे बाजारातील चिंताही वाढली. आंतरबँक परकीय चलन बाजारात रुपया 94.25 वर उघडला आणि दिवसभर एका मर्यादित कक्षेत व्यवहार करत राहिला. दिवसभरात त्यानं 94.18 चा उच्चांक आणि 94.31 चा नीचांक गाठला. अखेरीस रुपया 94.23 (तात्पुरता) अंकांवर बंद झाला, जो त्याच्या मागील बंद भावापेक्षा 22 पैशांनी कमी होता. यापूर्वी गुरुवारी, रुपया 23 पैशांनी कमकुवत होऊन 94.01 वर बंद झाला होता, ही सलग चौथ्या दिवसाची घसरण होती.
तेलाच्या किमती उच्च पातळीवर कायम :
जूनमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या ब्रेंट क्रूड तेलाच्या प्रति बॅरलची किंमत गुरुवारी 3.1 टक्क्यांनी वाढून 105.07 डॉलरवर बंद झाली आणि एका क्षणी ती 107 डॉलरपर्यंत पोहोचली होती. व्यापाऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय असलेला, जुलैमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या ब्रेंट तेलाच्या प्रति बॅरलची किंमत 101 डॉलरवर पोहोचल्यानंतर 99.35 डॉलरवर बंद झाली. शुक्रवारी सकाळी, ब्रेंट क्रूड तेलाची किंमत 98 सेंट्सनं वाढून प्रति बॅरल 100.33 डॉलर झाली होती. यूएस बेंचमार्क क्रूड तेलाची किंमत 81 सेंट्सनं वाढून प्रति बॅरल 96.66 डॉलर झाली.










