Dahi Handi Accident : दहीहंडी म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते उंचच उंच मानवी मनोरे… जल्लोष… थरार आणि विजयासाठीची चुरस. मात्र या थरांमागे अनेकदा एका गोविंदाचा जीव आणि त्याच्या कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य पणाला लागतं. भिवंडीत राहणाऱ्या नागेश भोईर ( Nagesh Bhoir ) याची कहाणी अशीच काळीज पिळवटून टाकणारी आहे. सन 2009 मध्ये दहीहंडीच्या मनोऱ्यावरून पडलेल्या नागेशचं आयुष्यच बदलून गेलं. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी झालेल्या या अपघातानंतर गेली अनेक वर्षे तो बिछान्याला खिळून आहे. कधीकाळी दहीहंडीच्या उत्साहात सहभागी होणारा नागेश आज स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही. उपचारांसाठी त्याला वारंवार रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. दोन महिन्यांतून एकदा उपचारांची गरज भासते, तर वर्षभरात अनेक वेळा मोठ्या आर्थिक संकटाला कुटुंबाला सामोरं जावं लागतं.
आश्वासनं मिळाली… पण मदत अपुरीच! ( Dahi Handi Accident )
नागेशच्या उपचारांसाठी अनेकांनी मदतीचं आश्वासन दिलं. काहींनी मदतीचा हातही पुढे केला. मात्र दीर्घकाळ सुरू असलेल्या उपचारांचा खर्च आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहता ही मदत अपुरी पडत आहे. नागेशच्या कुटुंबात आई-वडील आणि मोठी बहीण असा परिवार आहे. वडील खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते आता निवृत्त झाले आहेत. मात्र आता आई-वडिलांचंही वय झालं आहे. घरातील कर्ता पुरुष असलेला नागेशच बिछान्याला खिळून असल्याने कुटुंबावर मोठं संकट ओढवलं आहे. त्याच्या उपचारासाठी खर्च त्याचे मित्र हे आपल्या पगारातून करीत आहेत.तर मित्र खूप होते आता काहीच उरले आहेत जे माझ्या उपचाराचा खर्च उचलत आहेत.
हेही वाचा : Krishna Janmashtami 2026: आज मध्यरात्री जन्मणार बाळकृष्ण! जाणून घ्या
दहीहंडी लावा… पण जीव धोक्यात घालू नका! ( Dahi Handi )
“दहीहंडीचा सण साजरा करा, मनोरे रचा, स्पर्धेत सहभागी व्हा… पण हा खेळ समजून खेळा. आपला जीव धोक्यात घालू नका. कारण एका क्षणाच्या अपघातानंतर केवळ गोविंदाचं नाही, तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून जातं.” नागेशच्या आयुष्यात घडलेली घटना ही इतर गोविंदांसाठी मोठी शिकवण ठरत आहे. काही क्षणांचा थरार आणि विजयाचा आनंद एका कुटुंबाला आयुष्यभराच्या वेदना देऊ शकतो, हे नागेशची कहाणी सांगते.
आईची मुख्यमंत्र्यांकडे हळवी मागणी…
नागेशच्या आईच्या डोळ्यांत आजही मुलाला पुन्हा उभं करण्याचं स्वप्न आहे. मात्र वाढता उपचारांचा खर्च आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती त्यांच्यासमोर मोठं आव्हान बनून उभी आहे. माझा मुलगा वयाच्या 24व्या वर्षापासून बिछान्याला खिळून आहे. आम्हाला आर्थिक मदत नको. मात्र त्याच्या उपचारासाठी दर महिन्याला जो खर्च येतो, त्याची कायमस्वरूपी व्यवस्था सरकारने करावी,” अशी हळवी मागणी नागेशच्या आईने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
ही मागणी केवळ एका आईची नाही, तर आपल्या मुलाला पुन्हा उभं पाहण्याची धडपड करणाऱ्या एका कुटुंबाची आर्त हाक आहे. दहीहंडीच्या मैदानात आज 9-10 थरांचे मनोरे उभे राहत आहेत. मात्र त्या उंच थरांकडे पाहताना नागेशसारख्या गोविंदांची कहाणीही लक्षात ठेवण्याची गरज आहे.
सण साजरा करा… स्पर्धा करा… पण सुरक्षिततेला प्राधान्य द्या. कारण मनोरा कोसळल्यानंतर केवळ एक गोविंदा खाली पडत नाही, तर त्याच्यासोबत एका संपूर्ण कुटुंबाची स्वप्नंही कोसळू शकतात.




