Nagpur Hit And Run Case: आज सकाळी नागपूर मध्ये मोठी घटना घडली आहे. मार्निंग वॉलला गेलेल्या वृद्ध महिलेला कारने जोरदार धडक दिली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर शहरातील धरमपेठ परिसरात सकाळी हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली असून या अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. सुगंध मंगल कार्यालयाजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ७० वर्षाच्या मंगला केवटे या नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. त्याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर त्या रस्त्यावर दूर फेकल्या गेल्या आणि गंबीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर कारचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काही नागरिकांनी चालक मद्यप्राशन अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला असून, तसेच परिसरातील अनियंत्रित वाहतूक आणि फूटपाथवरील अतिक्रमणावरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवला आहे. फरार कारचा शोध सुरू असून लवकरच आरोपीला पकडण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.






