Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • आधी व्हिडिओत गंभीर आरोप, नंतर आत्महत्येचा प्रयत्न अन् मृत्यू; वाचा फलटण डॉक्टर प्रकरणाची Inside Story
गुन्हा

आधी व्हिडिओत गंभीर आरोप, नंतर आत्महत्येचा प्रयत्न अन् मृत्यू; वाचा फलटण डॉक्टर प्रकरणाची Inside Story

Phaltan Doctor Death
45
Phaltan Doctor Death: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. धमकी, राजकीय दबाव आणि रुग्णालय प्रशासनावर केलेल्या आरोपांनंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलं? जाणून घेऊया.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूने सातारा जिल्ह्यात (Phaltan Doctor Death) खळबळ उडाली आहे. वरिष्ठांकडून होणारा कथित त्रास, राजकीय दबाव आणि धमकीच्या आरोपांनंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप केला होता.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूचे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे. २७ ऑगस्ट रोजी मुंबईतील सायन रेल्वेस्थानक परिसरात त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना खाली उतरवत त्यांचा जीव वाचवला. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी मोठे बदल! जाणून घ्या आजपासून काय होणार महाग आणि स्वस्त?

या प्रकरणात डॉ. रुपनवर( Dr. Rajendra Rupanwar News) यांनी यापूर्वी केलेले काही आरोपही समोर आले आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून त्रास होत असल्याचा तसेच काही व्यक्तींकडून राजकीय दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याचबरोबर मंत्री तानाजी सावंत यांचे ओएसडी प्रसाद कोडे-देशमुख यांच्याकडून धमकी मिळाल्याचा आरोपही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला होता. या आरोपांची अधिकृतपणे पुष्टी झालेली नसून, त्याबाबत तपास यंत्रणांकडून चौकशी होणे अपेक्षित आहे.

फिटनेस प्रमाणपत्रावरून नेमका वाद काय?

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात एका राजकीय पक्षाशी संबंधित काही व्यक्ती फलटण उपजिल्हा रुग्णालयात फिटनेस प्रमाणपत्रासाठी आल्या होत्या. यावेळी डॉ. रुपनवर यांच्यावर प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे.

प्रमाणपत्र देण्याबाबत शंका असल्याने डॉ. रुपनवर यांनी ते देण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी त्यांच्याशी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांनी केला होता.

या घटनेबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, संबंधितांवर कारवाई होण्याऐवजी आपल्यावरच कारवाई करण्यात आल्याचा दावा डॉ. रुपनवर यांनी केला होता. त्यांचे वेतन रोखण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते.

सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत गंभीर आरोप

या संपूर्ण प्रकारानंतर डॉ. रुपनवर मानसिक तणावात असल्याचे त्यांच्या सोशल मीडिया व्हिडिओमधून समोर आले होते. त्यांनी आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याचे सांगितले जाते.

तसेच, आपल्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींची नावे डायरीमध्ये लिहिल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या तळहातावर लिहिलेला एक मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये ‘माझा संशयित मृत्यू झाल्यास जबाबदार व्यक्ती प्रसाद कोडे-देशमुख’ असा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या सर्व आरोपांची सत्यता तपासातूनच स्पष्ट होणार आहे.

२७ ऑगस्टला मुंबईत आत्महत्येचा प्रयत्न

२७ ऑगस्ट रोजी डॉ. रुपनवर सायन रेल्वेस्थानक परिसरातील एका उंच ठिकाणी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

जवानांनी प्रयत्न करून त्यांना खाली उतरवले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, चार दिवस उपचार सुरू राहिल्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.

डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूची माहिती फलटण तसेच त्यांच्या मूळ गाव परिसरात पोहोचताच नातेवाईक आणि नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

पार्थिव रुग्णालयातून हलवण्यास नातेवाईकांचा विरोध

डॉ. रुपनवर यांचे पार्थिव मुंबईहून फलटणकडे आणण्यात येत असल्याची माहिती आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत पार्थिव उपजिल्हा रुग्णालयातून हलवणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याचे समजते.

संबंधित व्यक्तींवर तातडीने कारवाई किंवा अटक न झाल्यास उपजिल्हा रुग्णालयासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा इशारा नातेवाईकांनी दिल्याची माहिती आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित

दरम्यान, डॉ. रुपनवर यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांच्याविरोधात चौकशी समिती नेमण्यात आली होती.

या चौकशीच्या पार्श्वभूमीवर डॉ. लीला मदने यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे डॉ. रुपनवर यांच्या मृत्यू प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.

आता तपासातून कोणती माहिती समोर येणार?

डॉ. रुपनवर यांच्यावर नेमका कोणता दबाव होता? फिटनेस प्रमाणपत्राच्या प्रकरणात नेमके काय घडले? संबंधित व्यक्तींनी त्यांच्याशी गैरवर्तन केले होते का? तक्रार केल्यानंतर त्यांच्यावरच कारवाई का करण्यात आली? तसेच धमकीच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपास आणि प्रशासकीय चौकशीतून समोर येणे अपेक्षित आहे.

फलटण उपजिल्हा रुग्णालयात यापूर्वीही डॉक्टरच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे या घटनेनंतर रुग्णालयातील प्रशासकीय कारभार आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूमागील नेमकी कारणे आणि त्यांच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts