Tamhini Ghat: रायगडच्या ताम्हाणी घाटात रस्त्यापासून १५ ते २० फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी हत्येचा संशय व्यक्त होत असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.
रायगड जिल्ह्यातील ताम्हाणी घाट परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रस्त्यापासून सुमारे १५ ते २० फूट खोल दरीत हा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोध आणि बचावकार्य सुरू केले.
मिळालेल्या माहितीनुसार, साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना ताम्हाणी घाटातील दरीत महिला पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. मात्र दरी खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्याचे आव्हान निर्माण झाले.
हेही वाचा: ३५ आंदोलने, ९ उपोषणे आणि तरीही आरक्षणाचा प्रश्न कायम; जरांगे की सरकार, नेमकं चुकतंय कुठे?
यानंतर SVRSS सागर रेस्क्यू टीम, कोलाड यांची मदत घेण्यात आली. रेस्क्यू पथकाने आवश्यक साधनसामग्री आणि रोपच्या सहाय्याने दरीत उतरून महिलेचा मृतदेह बाहेर काढला. बचावकार्यादरम्यान मोठी खबरदारी घेण्यात आली.
दरम्यान, महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. हा अपघात आहे की महिलेची हत्या करण्यात आली आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थिती पाहता हत्येचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी त्या दिशेनेही तपास सुरू केल्याची माहिती आहे.
महिलेची ओळख पटवण्याचे काम तसेच तिच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, त्याच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे ताम्हाणी घाट परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला, ती दरीत कशी पोहोचली आणि या घटनेमागे घातपाताचा प्रकार आहे का, या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तपासाला दिशा दिली जात आहे.



