Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Drishyam The Conclusion: अजय देवगणच्या ‘दृश्यम: द कन्क्लूजन’च्या ट्रेलरला CBFCची हिरवी झेंडी; कधी आणि कुठे होणार लॉन्च?
मनोरंजन

Drishyam The Conclusion: अजय देवगणच्या ‘दृश्यम: द कन्क्लूजन’च्या ट्रेलरला CBFCची हिरवी झेंडी; कधी आणि कुठे होणार लॉन्च?

Drishyam The Conclusion
29
Drishyam The Conclusion: अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘दृश्यम: द कन्क्लूजन’च्या ट्रेलरची चाहत्यांना उत्सुकता आहे. अशातच ट्रेलरला CBFCकडून मंजुरी मिळाल्याने आता त्याच्या रिलीजची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.

अजय देवगणच्या ‘दृश्यम’ मालिकेच्या पुढील भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहता आहेत. ‘दृश्यम: द कन्क्लूजन’ या तिसऱ्या भागाभोवती आधीपासूनच मोठी चर्चा आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर आता चाहत्यांच लक्ष ट्रेलरकडे लागलं आहे. अशातच ट्रेलरबाबत एका महत्वाची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाच्या ट्रेलरला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन अर्थात CBFCची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता ट्रेलर रिलीज होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा: ‘चला हवा येऊ द्या’ला निलेश साबळेंचा टाटा-बाय बाय! आगामी सिनेमाबाबत केला मोठा खुलासा

ट्रेलरला U/A 16+ प्रमाणपत्र

‘बॉलिवूड हंगामा’च्या रिपोर्टनुसार, ‘दृश्यम: द कन्क्लूजन’च्या ट्रेलरची रनटाइम 2 मिनिटे 52 सेकंद आहे. 1 सप्टेंबर रोजी या प्रोमोला CBFCकडून U/A 16+ प्रमाणपत्र देण्यात आलं.

ट्रेलरला सेन्सॉरची मंजुरी मिळाल्याने निर्माते आता त्याच्या लॉन्चची तयारी करत असल्याची चर्चा आहे. मात्र, अधिकृतरित्या ट्रेलर रिलीजची तारीख जाहीर होणं अद्याप बाकी आहे.

गोव्यात होणार भव्य ट्रेलर लॉन्च?

रिपोर्टनुसार, या सिनेमाचा थिएट्रिकल ट्रेलर गोव्यात एका खास कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित केला जाऊ शकतो. या लॉन्च इव्हेंटसाठी चित्रपटातील प्रमुख कलाकार एकत्र येण्याची शक्यता आहे.

हा कार्यक्रम 8 किंवा 9 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, ‘दृश्यम 2’चा ट्रेलर लॉन्चही गोव्यातच करण्यात आला होता. त्यामुळे तिसऱ्या भागासाठीही निर्माते गोव्यातच भव्य कार्यक्रम आयोजित करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.

अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत

‘दृश्यम: द कन्क्लूजन’मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत तब्बू, श्रिया सरन आणि रजत कपूर हे कलाकारही त्यांच्या आधीच्या व्यक्तिरेखा पुढे नेताना पाहायला मिळतील.

या भागात काही नवीन कलाकारांचीही एंट्री झाली आहे. जयदीप अहलावत राजवीर सिंहची भूमिका साकारत असून, प्रकाश राज इंद्रजीत शेट्टीच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय कमलेश सावंत, इशिता दत्ता आणि मृणाल जाधव यांचाही सिनेमात सहभाग आहे.

सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन

‘दृश्यम: द कन्क्लूजन’चं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केलं आहे. अभिषेक पाठक, आमिल कीयन खान आणि परवेज शेख यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे.

स्टार स्टुडिओ18 प्रस्तुत आणि पॅनोरमा स्टुडिओज निर्मित या चित्रपटाची निर्मिती आलोक जैन, अजीत अंधारे, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे.

चित्रपट कधी रिलीज होणार?

‘दृश्यम’ फ्रँचायझीच्या आधीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे तिसऱ्या भागाकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. आता ट्रेलरमध्ये नेमकं काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे. ‘दृश्यम: द कन्क्लूजन’ हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts