Vidyānand Bapat Attack: पुण्यात गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. बापट यांना मारहाण करणारा संतोष चव्हाण याचा व्हिडीओ समोर आला असून, गणेशोत्सवावर निर्बंध लादल्यास अनेक कुटुंबांच्या रोजगारावर परिणाम होईल, असा दावा त्याने केला आहे.
विद्यानंद बापट (Vidyānand Bapat) हे सातत्याने गणेशोत्सवातील डीजेच्या (Ganeshotsav Sound Pollution) वापरावर निर्बंध आणण्याची मागणी करत आहेत. याच भूमिकेमुळे संतप्त झालेल्या संतोष चव्हाणने त्यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर चव्हाण घटनास्थळावरून निघून गेला होता. तसेची पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली.
हेही वाचा: समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; टोलच्या बदल्यात सुविधांचा अभाव?
संतोष चव्हाण व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणाला?
अटकेपूर्वी संतोष चव्हाणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने गणेशोत्सवाशी संबंधित मंडळे, कार्यकर्ते आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या रोजगाराचा मुद्दा उपस्थित केला.
चव्हाणच्या म्हणण्यानुसार, गणेशोत्सवात डीजे आणि ढोल-ताशांमुळे (DJ Sound Pollution Pune) नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. मात्र, उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याच्या नावाखाली डीजे आणि ढोल-ताशांवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली जात असल्याचे त्याचे म्हणणे आहे. LS Marathi News Channel
त्याने पुण्यातील राजकीय प्रतिनिधित्वाचाही संदर्भ दिला. पुण्यात एक खासदार, आठ आमदार आणि मोठ्या संख्येने नगरसेवक असूनही गणेश मंडळांच्या बाजूने ठामपणे भूमिका मांडणारे नेते फारसे दिसत नाहीत, असा आरोप त्याने केला. निवडणुकीच्या काळात मात्र हेच मंडळांचे कार्यकर्ते राजकीय पक्षांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर काम करतात, असेही त्याने म्हटले.
गणेश मंडळांचे कार्यकर्ते केवळ उत्सवापुरते मर्यादित राहत नाहीत, तर वर्षभर सामाजिक उपक्रम राबवतात, रक्तदान शिबिरे घेतात आणि विविध मदतकार्य करतात, असा दावा चव्हाणने केला. कोरोना काळातही अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना मदत केल्याचे त्याने नमूद केले.
त्याच्या मते, मंडळांवर किंवा कार्यकर्त्यांवर संकट आले की राजकीय नेते त्यांच्या पाठीशी उभे राहत नाहीत. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून आपल्याला याबाबत नाराजी असल्याचे त्याने व्हिडीओमध्ये म्हटले.
गणेशोत्सव सुरू झाला की पर्यावरण आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत येतो. उत्सव कसा साजरा करावा, याबाबत मंडळांना सूचना दिल्या जातात. मात्र, पुणेकरांना गणेशोत्सव कसा साजरा करायचा याची जाणीव असल्याचा दावा चव्हाणने केला.
पुण्यात हजारो लहान-मोठी गणेश मंडळे असून त्यापैकी अनेक मंडळे उत्सवाच्या काळात विविध सेवा आणि व्यावसायिकांना काम देतात. मंडळांच्या माध्यमातून सजावट, प्रकाशयोजना, ट्रॅक्टर-ट्रॉली, साऊंड सिस्टिम यांसह अनेक क्षेत्रांतील लोकांना रोजगार मिळतो, असा मुद्दा त्याने उपस्थित केला.
चव्हाणने विद्यानंद बापट (Vidyanand Bapat News) यांच्या भूमिकेवरही टीका केली. साऊंडमुळे नागरिकांना त्रास होत असल्यास निर्धारित ध्वनिमर्यादेचे पालन केले पाहिजे, मात्र पूर्णपणे साऊंड बंद करण्याची मागणी योग्य नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.
त्याने पुढे असा दावा केला की, गणेश मंडळांमधील साऊंड सिस्टिम बंद झाल्यास त्यावर अवलंबून असलेल्या अनेक व्यावसायिकांचे उत्पन्न थांबू शकते. त्यामुळे हा केवळ डीजेचा प्रश्न नसून त्याच्याशी संबंधित अनेक कुटुंबांच्या रोजगाराचा मुद्दाही आहे, असे त्याने सांगितले.
दरम्यान, विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पोलिसांकडून तपास सुरू असून, संतोष चव्हाणला अटक करण्यात आली आहे. हल्ल्याचे नेमके कारण, तसेच या प्रकरणामागील इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.




