Konkan Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग आता वाढली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांनी एसटी बसचे आरक्षण करण्यास सुरुवात केली आहे. गुहागर आगारातून आतापर्यंत 173 बसचे बुकिंग झाले असून, यंदा 400 पेक्षा जास्त बसचे बुकिंग होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर आणि राज्यातील इतर भागातून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणातील आपल्या मूळ गावी जातात. त्यामुळे रेल्वे आणि एसटी बसच्या आरक्षणाला मोठी मागणी असते.
गुहागरमधून 173 बसचे बुकिंग ( Konkan Ganeshotsav 2026 )
गुहागर आगारात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच बसचे आरक्षण सुरू झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार 35 बसचे आगाऊ आरक्षण आणि 133 बसचे ग्रुप बुकिंग झाले आहे. त्यामुळे येत्या काळात बसच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : गणपती मंडळांसाठी मोठी बातमी! राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी;
कोकणासाठी 5,220 अतिरिक्त एसटी बसफेऱ्या ( Konkan ST Bus Booking )
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन MSRTC ने गणेशोत्सवाच्या काळात कोकण मार्गावर 5,220 अतिरिक्त बसफेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष बससेवा 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत उपलब्ध राहणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या भागातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना या अतिरिक्त सेवांचा फायदा होणार आहे.
गणेश चतुर्थी 14 सप्टेंबर 2026 रोजी आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या आधीच्या काही दिवसांत मुंबई आणि ठाण्यातून कोकणाकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोकणातील इतर भागात जाणाऱ्या प्रवाशांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा न करता उपलब्ध बस आणि रेल्वे आरक्षणाची माहिती वेळेत तपासणे फायदेशीर ठरणार आहे.
रेल्वेच्या विशेष गाड्यांनाही मोठी मागणी ( Konkan Ganpati Travel )
कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्यांचेही नियोजन केले आहे. मुंबई, रत्नागिरी, सावंतवाडी आणि इतर मार्गांवर विशेष सेवा वाढवण्यात येत आहेत. यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात कोकणवारी करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी राहण्याची शक्यता आहे.








