Hepatitis in Monsoon: पावसाळ्यात दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्नामुळे हिपॅटायटिसचा धोका वाढू शकतो. यकृताचे आरोग्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.
पावसाळा सुरू झाला असून असून आता वातावरणात आर्द्रता वाढते आणि अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर दूषित पाणी, अस्वच्छ खाद्यपदार्थ आणि स्वच्छतेकडे झालेले दुर्लक्ष यामुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. यामध्ये हिपॅटायटिसचाही समावेश आहे. विशेषतः हिपॅटायटिस ए (hepatitis A) आणि ई (hepatitis E) हे दूषित पाणी किंवा अन्नाच्या माध्यमातून पसरणारे प्रकार पावसाळ्यात अधिक चिंतेचा विषय ठरू शकतात.
हेही वाचा: ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! मातोश्रीच्या बैठकीला कळंबचे 10 नगरसेवक गैरहजर; भाजपच्या वाटेवर?
हिपॅटायटिस म्हणजे काय?
हिपॅटायटिस म्हणजे यकृताला आलेली सूज. शरीरातील पचनक्रिया संबंधित प्रक्रिया आणि विविध घटकांचे नियमन करण्यामध्ये यकृताची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे यकृतावर संसर्गाचा परिणाम झाल्यास आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
पावसाळ्यात हिपॅटायटिसचा धोका का वाढतो? (hepatitis in monsoon)
पावसाळ्या पाण्यासोबत सांडपाणी मिसळल्यास पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता असते. असे पाणी प्यायल्यास किंवा त्याचा वापर स्वयंपाकासाठी केल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो.
याशिवाय बाहेरचे उघडे खाद्यपदार्थ, नीट न धुतलेली फळे- भाज्या, अर्धवट शिजलेले अन्न आणि हातांची स्वच्छता न राखणे यामुळेही संसर्ग होण्याची शक्यता असते.
कोणती लक्षणे दिसू शकतात? ( hepatitis symptoms)
हिपॅटायटिसचा संसर्ग झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये एकसारखी लक्षणे दिसतीलच असे नाही. मात्र काही सामान्य लक्षणांमध्ये ताप, सतत थकवा जाणवणे, भूक मंदावणे, मळमळ, उलट्या आणि पोटाच्या भागात अस्वस्थता यांचा समावेश होतो.
काही रुग्णांमध्ये लघवीचा रंग नेहमीपेक्षा गडद होणे, त्वचा किंवा डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर दिसणे यांसारखी कावीळची लक्षणेही दिसू शकतात. अशी लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्याल? ( monsoon health tips)
पावसाळ्यात हिपॅटायटिससह इतर जलजन्य संसर्गांपासून बचाव करण्यासाठी दैनंदिन जीवनातील काही सवयींकडे विशेष लक्ष द्यावे.
पिण्यासाठी सुरक्षित आणि शुद्ध पाण्याचा वापर करा.
बाहेर उघड्यावर ठेवलेले किंवा अस्वच्छ ठिकाणी बनवलेले पदार्थ खाणे टाळा.
फळे आणि भाज्या वापरण्यापूर्वी व्यवस्थित स्वच्छ धुवा.
अन्नपदार्थ योग्य प्रकारे शिजवून आणि सुरक्षित पद्धतीने साठवून ठेवा.
जेवण करण्यापूर्वी तसेच शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुवा.
कच्चे किंवा अपुरे शिजलेले खाद्यपदार्थ खाणे शक्यतो टाळा.
घरातील स्वयंपाकघर आणि पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ ठेवा.
मुलांना लहानपणापासून हात स्वच्छ धुण्याची सवय लावा.


