Guru Purnima 2026: गुरुपौर्णिमा 2026 निमित्त २ शुभ योगांचा संयोग होत आहे. या पवित्र दिवशी गुरु पूजेची शुभ वेळ आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या.
यंदाची गुरुपौर्णिमा धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विशेष महत्वाची मानली जात आहे. या दिवशी एकाच वेळी तीन शुभ योगांचा संयोग होत असल्याने पूजा, जप, स्नान आणि दान यांचे महत्व अधिक वाढले आहे. या विशेष दिवशी कोणते योग तयार होत आहेत, त्यांचे महत्व काय आहे आणि गुरुपुजेसाठी शुभ वेळ कोणती आहे, हे जाणून घेऊया.
आषाढ महिन्याच्या शुल्क पक्षातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2026) साजरी केली जाते. यंदा हा पवित्र दिवस बुधवार २९ जुलै २०२६ रोजी साजरा होत आहे. भारतीय परंपरेत गुरूंना ज्ञान, संस्कार आणि योग्य जीवनमार्गाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी गुरूंची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना केली जाते.
हेही वाचा: ‘दारू, ड्रग्स आणि…’; Gen Z बद्दल कंगना रनौतच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सोशल मीडियावर खळबळ
ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार यावर्षी गुरुपौर्णिमेला (Guru Purnima) गजकेसरी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवी योग असे तीन शुभ योग एकत्र येत आहेत. त्यामुळेच या दिवशी केलेले धार्मिक विधी, जप, दान आणि गुरुसेवा अधिक पुण्यदायी मानली जाते.
गुरुपौर्णिमेचे धार्मिक महत्व
हिंदू धर्मात गुरूंना अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा मार्गदर्शक मानले जाते. गुरूंच्या मार्गदर्शनामुळे व्यक्तीला योग्य- अयोग्याची जाणीव होते आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या आध्यत्मिक, शैक्षणिक आणि जीवनातील सर्व गुरुंप्रती आदर व्यक्त करतात.
परंपरेनुसार आषाढ पौर्णिमेलाच महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. वेदांचे वर्गीकरण करून त्यांचे ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यामुळे या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हटले जाते.
गुरुपौर्णिमेला तयार होणारे तीन शुभ योग
गजकेसरी योग (Gajakesari Yoga)
गुरु आणि चंद्र यांच्या शुभ संयोगामुळे गजकेसरी योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग मान-सन्मान, बुद्धिमत्ता आणि यश वाढवणारा मानला जातो. या काळात गुरुंची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेणे अत्यंत शुभ मानले जाते.
सर्वार्थ सिद्धी योग (Sarvartha Siddhi Yoga)
सर्वार्थ सिद्धी योग हा शुभ कार्यांसाठी अत्यंत मंगल मानला जातो. या योगात सुरू केलेली कामे यशस्वी होण्याची शक्यता अधिक असल्याचे मानले जाते. त्यामुळे गुरुपूजा, जप, दान आणि धार्मिक विधी करण्यासाठी हा काळ अनुकूल मानला जातो.
रवी योग (Ravi Yoga)
गुरुपौर्णिमेच्या दिवशी रवी योगाचाही संयोग आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या योगात केलेले शुभ कार्य नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवते. सूर्योपासना, स्नान, दान आणि पूजा यासाठी हा योग लाभदायक मानला जातो.
गुरुपौर्णिमा 2026 तिथी (Guru Puja Muhurat)
हिंदू पंचांगानुसार आषाढ पौर्णिमा २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजून १८ मिनिटांनी सुरू होईल आणि २९ जुलै रोजी रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी स्नान करून गुरुंची पूजा आणि दानधर्म करणे शुभ मानले जाते.
गुरुपूजेची शुभ वेळ
29 जुलै 2026 रोजी गुरुपूजेसाठी सकाळचा कालावधी विशेष शुभ मानला जातो. सकाळी 5:41 ते सकाळी 9:05 या वेळेत गुरुंची पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
गुरुपौर्णिमेला काय करावे? (Guru Purnima Puja Vidhi)
सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे.
सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून गुरुंचे स्मरण करावे.
गुरुंच्या प्रतिमा किंवा पादुकांची फुले, अक्षता आणि दीप लावून पूजा करावी.
गुरुमंत्राचा जप करून ज्ञान, सद्बुद्धी आणि योग्य मार्गदर्शनासाठी प्रार्थना करावी.
शक्य असल्यास गुरुंना प्रत्यक्ष भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.
आपल्या श्रद्धेनुसार वस्त्र, फळे, मिठाई, दक्षिणा किंवा अन्य भेटवस्तू अर्पण करून गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.
टीप: लेखात नमूद केलेले योग, तिथी आणि शुभ वेळा या वैदिक पंचांग व ज्योतिषशास्त्रीय मान्यतांवर आधारित असून, विविध पंचांगांनुसार त्यामध्ये किंचित फरक असू शकतो.









