Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • Bhandara: बाप रे! शिक्षणासाठी मृत्यूच्या छायेत ‘वारी’; भंडारा जिल्ह्यात चिमुरड्यांचा जीवघेणा प्रवास
ताज्या बातम्या

Bhandara: बाप रे! शिक्षणासाठी मृत्यूच्या छायेत ‘वारी’; भंडारा जिल्ह्यात चिमुरड्यांचा जीवघेणा प्रवास

Bhandara

Bhandara School Route: खैरटोला ते खंदाळ हा अडीच किलोमीटरचा रस्ता घनदाट जंगलातून जातो. या भागात रानटी डुकरे, बिबट्या आणि इतर हिंस्त्र प्राण्यांचा मुक्त वावर आहे.

LS मराठी पत्रकार, नितीन कुथे

भंडारा : महाराष्ट्र एकीकडे डिजिटल होत असल्याच्या गप्पा मारल्या जात आहेत, तर दुसरीकडे भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून काळजाचा थरकाप उडवणारे वास्तव समोर आले आहे. तुमसर तालुक्यातील खैरटोला येथील चिमुरड्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागते. पण हे अंतर साधेसुधे नाही, तर हे अंतर आहे वाघ, बिबट्या आणि अस्वलांच्या साम्राज्यातून जाणारे!

जंगलातून ‘मृत्यूची धास्ती’, पाठीवर ‘दप्तराचे ओझे’

खैरटोला ते खंदाळ हा अडीच किलोमीटरचा रस्ता घनदाट जंगलातून जातो. या भागात रानटी डुकरे, बिबट्या आणि इतर हिंस्त्र प्राण्यांचा मुक्त वावर आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी जेव्हा आई-वडील मजुरीला जातात, तेव्हा ही लहान मुलं देवाच्या भरवशावर या जंगलातून एकटीच प्रवास करतात. कधी एखादा अनोळखी दुचाकीस्वार लिफ्ट देतो, तर कधी शाळेचे मुख्याध्यापकच या मुलांसाठी ‘देवदूत’ बनून धावून येतात.

मुख्याध्यापकांची माणुसकी; पण प्रशासनाचे काय?

खंदाळ जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक जीवन संग्रामे हे माणुसकीच्या नात्याने रोज काही मुलांना आपल्या दुचाकीवर शाळेत आणतात. मात्र, प्रत्येक मुलाला रोज शाळेत नेणे त्यांनाही शक्य नाही. या मार्गावर राज्य परिवहन मंडळाची (ST) बस धावते, पण ती खैरटोलाच्या मुलांसाठी थांबत नाही, हे सर्वात मोठे दुर्दैव आहे.

प्रशासनाला जाग कधी येणार?

आज खैरटोलाचे विद्यार्थी दुहेरी कात्रीत अडकले आहेत. एकीकडे रस्ता सुरक्षित नाही आणि दुसरीकडे हक्काची बस थांबत नाही. उद्या जर एखाद्या चिमुरड्यावर वन्यप्राण्याने हल्ला केला, तर त्याचं पाप कोणाच्या माथी असेल? मजुरी करणाऱ्या पालकांनी मुलांचं शिक्षण बंद करावं का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

आता तरी जिल्हा प्रशासन आणि परिवहन विभाग या चिमुरड्यांच्या जीवासाठी आपली झोप मोडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts