• Home
  • राजकारण
  • शिरपूर-वरवाडे नगरपालिकेत ४० वर्षांनंतर भाजपाचा ऐतिहासिक विजय
Top News

शिरपूर-वरवाडे नगरपालिकेत ४० वर्षांनंतर भाजपाचा ऐतिहासिक विजय

BJP leaders and supporters celebrate historic victory in Shirpur–Warwade municipal council elections

BJP Historic Victory Shirpur Warwade : शिरपूर-वरवाडे नगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल ४० वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश मिळवत नगरपालिकेवर सत्ता स्थापन केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिरपूर-वरवाडे नगरपालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी कौल देत भाजपाला बहुमत बहाल केले आहे.

२०१९ मध्ये शिरपूरचे आमदार अमरीशभाई पटेल यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर शिरपूर शहर आणि परिसरात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढत गेली. या पार्श्वभूमीवर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवले असून नगरपालिकेच्या एकूण ३२ जागांपैकी तब्बल ३१ जागांवर भाजपाचे नगरसेवक निवडून आले आहेत. उर्वरित एकमेव जागा एमआयएम पक्षाला मिळाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार चिंतनभाई पटेल यांनी जोरदार मुसंडी मारत विजय मिळवला. चिंतनभाई पटेल यांना तब्बल १६ हजारांहून अधिक मते मिळाली असून हा फरक शहरातील जनतेचा भाजपावर असलेला विश्वास दर्शवतो. त्यांच्या विजयामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरात जल्लोष पाहायला मिळाला.

हे ही वाचा : पहा कुठे कुणाची सत्ता; या जिल्ह्यातील नगरसेवकांची यादी आली समोर

शिरपूरच्या जनतेने विकासाला दिले मत

या ऐतिहासिक विजयावर प्रतिक्रिया देताना आमदार अमरीशभाई पटेल म्हणाले की, “शिरपूरच्या जनतेने विकासाला मत दिले आहे. येथील जनता सुज्ञ असून मतदार राजा कोणत्याही भूलथापांना बळी पडलेला नाही. विकासकामे, पारदर्शक कारभार आणि भविष्यातील योजनांवर विश्वास ठेवून नागरिकांनी भाजपाला कौल दिला आहे. त्यामुळेच या ठिकाणी भाजपाचा मोठ्या प्रमाणात विजय झाला.”

विकासाला मिळालेली पावती

भाजपाच्या नेत्यांनीही हा विजय म्हणजे शिरपूरच्या विकासाला मिळालेली पावती असल्याचे सांगितले. आगामी काळात पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, शिक्षण व आरोग्य सुविधांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे आश्वासन नवनिर्वाचित नगरसेवकांनी दिले आहे.दरम्यान, काँग्रेससाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात असून पक्षाच्या स्थानिक नेतृत्वासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकूणच, शिरपूर-वरवाडे नगरपालिकेच्या निकालाने जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण दिले असून भाजपाच्या या ऐतिहासिक विजयाची सर्वत्र चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts