Google QR CAPTCHA : ऑनलाइन सुरक्षेला अधिक बळकट करण्यासाठी Google आता एका नव्या QR कोड आधारित CAPTCHA प्रणालीची चाचणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रभावामुळे पारंपरिक CAPTCHA प्रणाली सहज हॅक केली जात असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर Google अधिक सुरक्षित आणि आधुनिक पर्याय शोधत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या नव्या प्रणालीमुळे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेबाबत गंभीर प्रश्नही उपस्थित होत आहेत.
कसे काम करणार QR CAPTCHA?
आतापर्यंत वेबसाइटवर लॉगिन करताना किंवा व्हेरिफिकेशनसाठी वापरकर्त्यांना इमेज पझल, ट्रॅफिक सिग्नल किंवा बसच्या फोटोवर क्लिक करावे लागत होते. पण नव्या प्रणालीमध्ये फक्त मोबाईलने QR कोड स्कॅन करणे पुरेसे ठरणार आहे. QR कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित फोन Android डिव्हाइसवरील Google Play Services शी संपर्क साधेल. त्यानंतर Google संबंधित वेबसाइटवर खरा वापरकर्ता आहे की नाही, याची खात्री करेल.
गोपनीयता आणि सुरक्षिततेवरून वाद
Google च्या या नव्या QR आधारित CAPTCHA प्रणालीमुळे प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षेवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, या प्रक्रियेद्वारे वापरकर्त्यांची ऑनलाइन हालचाल थेट त्यांच्या मोबाईल डिव्हाइस किंवा Google खात्याशी जोडली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, वापरकर्ता Chrome मध्ये साइन इन नसला तरीही त्याची माहिती ट्रॅक केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, Reddit वर एका वापरकर्त्याने Google च्या सपोर्ट पेजचा संदर्भ देत दावा केला की, हे फीचर वापरण्यासाठी Android फोनमध्ये Google Play Services चे अद्ययावत व्हर्जन असणे आवश्यक असेल. त्यामुळे जुने स्मार्टफोन किंवा Google सेवा नसलेली उपकरणे वापरणाऱ्या युजर्सना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भविष्यात Google ही प्रणाली पूर्णपणे लागू केल्यास, इंटरनेट वापरण्याची पद्धतच बदलू शकते, अशी चर्चा आता तंत्रज्ञान क्षेत्रात सुरू झाली आहे.








