Gadima Panchavati controversy : मराठी भाषेला लाभलेले महाकवी आणि गीतकार ज्यांनी आपल्या गीतरामायणाद्वारे घराघरांत रामकथा पोहचवली ते म्हणजे ग.दि. माडगूळकर. पण याच ग.दि. माडगूळकर यांच्या घरी महाभारत होत असल्याची माहिती समोर आली आहे.
गदिमा यांचे नातू सुमित्र श्रीधर माडगूळकर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत गदिमांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारी ‘पंचवटी’ वास्तू पाडण्याच्या हालचालींना तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकरणामुळे आपल्या कुटुंबावर मानसिक दबाव निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, कुटुंबीयांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली आहे. तसेच, जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही दावा त्यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे.
सुमित्र माडगूळकर यांनी आपल्या पोस्टमध्ये ‘पंचवटी’ ही केवळ एक वास्तू नसून मराठी साहित्य, संस्कृती आणि गदिमांच्या आठवणींचा अमूल्य वारसा असल्याचे म्हटले आहे. या वास्तूशी असंख्य साहित्यिक, सांस्कृतिक आणि भावनिक आठवणी जोडलेल्या असल्यामुळे ती जपली गेली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. गीतररामयाणाची रचना पंचवटीतच झाली असे देखील म्हणले आहे. रम्यान, या वादामुळे माडगूळकर कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. गीतरामायणकरांच्या घरीच महाभारत सुरु असल्याचे दिसून येत आहे.
पंचवटी ही केवळ वास्तू नसून गदिमांच्या आठवणी, साहित्यिक वारसा आणि मराठी संस्कृतीचा जिवंत इतिहास असल्याचे त्यांनी नमूद केले. या वारशासाठी आपण अखेरच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचा ठाम निर्धारही सुमित्र माडगूळकर यांनी व्यक्त केला आहे. “चर्चा आणि बदनामी करण्यात गदिमांवर प्रेम असल्याचा आव आणणारेच काही लोक सहभागी आहेत,” असा आरोप त्यांनी आपल्या पोस्टमधून केला आहे. पैशाचा हव्यासापोटी हे लोकं कुठल्याही थराला जाऊ शकतेत असे देखील त्यांनी नमूद केले आहे.












