• Home
  • ताज्या बातम्या
  • पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच दणदणीत विजय; अभिषेक शर्माची वादळी खेळी
Top News

पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाच दणदणीत विजय; अभिषेक शर्माची वादळी खेळी

IND vs NZ 2nd T20I

India Beat New Zealand : भारतीय क्रिकेट संघानं न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियानं 48 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 238 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं पहिल्या दोन षटकांत दोन विकेट गमावल्या. त्यानंतरही संघानं जोरदार झुंज दिली पण शेवटी संघाला 7 बाद 190 धावाच काढता आल्या. या सामन्यात एकूण धावसंख्या 428 धावा झाली, जी दोन्ही संघांसाठी टी-20 सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. टीम इंडियानं पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

अभिषेक शर्माचं दमदार अर्धशतक :

नाणेफेक गमावल्यानंतर भारताला प्रथम फलंदाजी करायचं आमंत्रण देण्यात आलं. अभिषेक शर्मानं पहिल्या षटकात षटकार मारला, परंतु दुसऱ्या षटकात भारताला पहिला धक्का बसला. सॅमसन सात चेंडूत दोन चौकारांसह 10 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. तसंच 2023 नंतर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा इशान किशन या संधीचा फायदा उठवू शकला नाही, त्यानं पाच चेंडूत फक्त 8 धावा केल्या. टीम इंडियानं २७ धावसंख्येवर दोन विकेट गमावल्या होत्या. तिथून कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांनी 47 चेंडूत तिसऱ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी करत डाव सावरला.

रिंकु सिंहची दमदार फिनिशींग :

दरम्यान, अभिषेकनं 22 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. सूर्या 22 चेंडूत 32 धावा करुन बाद झाला, ज्यामध्ये एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. अभिषेक शतकाच्या मार्गावर होता, परंतु 35 चेंडूत 8 षटकार आणि पाच चौकारांसह 84 धावा करुन बाद झाला. त्याची विकेट ईश सोधीनेघेतली. त्यानंतर हार्दिक पांड्यानं 16 चेंडूत 25 धावा करुन संघाची सूत्रे हाती घेतली. शिवम दुबेनं फक्त नऊ धावा केल्या. अक्षर पटेलनंही फक्त पाच धावा केल्या, परंतु रिंकू सिंगनं स्फोटक खेळ केला. रिंकू 20 चेंडूत तीन षटकार आणि चार चौकारांसह 44 धावा करुन नाबाद राहिला. जेकब डफी आणि काइल जेमीसन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

कीवींची फलंदाजी अपयशी :

भारतानं दिलेलं 239 धावांचं डोंगराइतकं लक्ष्य गाठायला उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगनं डेव्हॉन कॉनवेला बाद केलं. दुसऱ्या षटकात रचिन रवींद्रला हार्दिक पांड्यानं बाद केलं. टिम रॉबिन्सननं 15 चेंडूत फक्त 21 धावा केल्या. सातव्या षटकात 52 धावा करुन न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला. ग्लेन फिलिप्सनं एका टोकापासून स्फोटक खेळ केला, त्यानं फक्त 29 चेंडूत अर्धशतक झळकावलं. फिलिप्स शानदार फलंदाजी करत टीम इंडियावर दबाव आणत होता. मात्र 14व्या षटकात अक्षर पटेलनं त्याला बाद केलं. फिलिप्सनं 40 चेंडूत 78 धावा केल्या, त्यात चार चौकार आणि सहा षटकार मारले. पुढच्याच षटकात मार्क चॅपमनही बाद झाला. या दोन विकेट्सनं न्यूझीलंडच्या आशा पूर्णपणे धुळीस मिळवल्या. शेवटी सँटनरनं 20 आणि डॅरिल मिशेलनं 28 धावा केल्या, परंतु कीवी संघ 190 धावांपर्यंतच पोहोचू शकला. वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts