MCA Bkc Food Outlets: MCA च्या बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्समधील फूड आउटलेट्सवर FDA ने मोठी कारवाई केली आहे. परवाना एका संस्थेच्या नावावर, तर प्रत्यक्ष व्यवसाय दुसऱ्याच कंपनीकडून सुरू असल्याचं तपासणीत समोर आलं. यासोबतच स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचं उल्लंघन आढळल्याने पाच आउटलेट्सचे परवाने आणि रजिस्ट्रेशन निलंबित करण्यात आले.
महाराष्ट्रात अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांची अमंलबजावणी अधिक कडक होताना दिसत आहे. आता या कारवाईचा फटका थेट मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) बांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या आउटलेट्सनाही बसला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA ) तपासणीनंतर पाच खाद्य व्यवसायांचे परवाने आणि रजिस्ट्रेशन निलंबित केले आहेत.
FDAच्या या कारवाईमुळे अन्न व्यवसाय चालवणाऱ्या संस्थांमध्ये खळबळ उडाली, असून परवाना, स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास कोणत्याही संस्थेवर कारवाई होऊ शकते, असा संदेश यातून गेला आहे.
हेही वाचा: 10 उपोषणं झाली, आरक्षण नाही! जरांगेंच्या 11व्या लढाईआधी जाणून घ्या पूर्ण हिशोब
MCAच्या कोणत्या आउटलेट्सवर कारवाई?
FDAच्या अधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट रोजी MCA च्या बीकेसी परिसरातील खाद्य आउटलेट्सची तपासणी केली. तपासणीत नियमांशी संबंधित त्रुटी आढळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २१ ऑगस्ट रोजी निलंबनाचे आदेश जरी करण्यात आले.
कारवाई करण्यात आलेल्या पाच ठिकाणांमध्ये:
परमिट रूम
पॅव्हिलियन
मेडिटेरेनियन
ओरिएंटल स्विंग
क्लब अँड पेस्ट्री काउंटर
यांचा समावेश आहे.
परवान्याच्या नावावरही FDA चा अपेक्षा
FDAच्या तपासणीत केवळ स्वच्छतेशी संबंधित बाबीच समोर आल्या नाहीत, तर ज्या संस्थेच्या नावावर खाद्य व्यवसायाचे परवाने, प्रत्यक्षात त्या ठिकाणी दुसरी कंपनी व्यवसाय चालवत असल्याचं आढळलं.
MCAच्या नावावर चार खाद्य व्यवसायांसाठी स्वतंत्र परवाने आणि एका स्नॅक काउंटरसाठी रजिस्ट्रेशन देण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्ष संचालन करणाऱ्या कंपनीच्या नावावर आवश्यक खाद्य व्यवसाय परवाना नसल्याचं तपासणीत निदर्शनास आलं.
अन्न व्यवसाय ज्या नावाने परवानाधारक आहे, त्याच परवान्याच्या अटींनुसार व्यवसाय चालवणे आवश्यक असते. या नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यानंतर FDAने पाचही परवान्यांवर कारवाई केली.
स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे नियमही तपासले
तपासणीदरम्यान आउटलेट्समध्ये अन्न हाताळणी (Food Safety Rules) आणि स्वच्छतेशी संबंधित नियमांचं पालन होतंय की नाही, याचीही पाहणी करण्यात आली.
FDAच्या माहितीनुसार, Food Safety and Standards Regulations, 2011 अंतर्गत असलेल्या स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या काही निकषांचं पालन झालेलं नसल्याचं आढळलं.
त्यामुळे परवाना प्रक्रियेतील त्रुटींसोबतच खाद्य व्यवसायाच्या प्रत्यक्ष संचालनाशी संबंधित नियमांचाही मुद्दा या कारवाईत महत्त्वाचा ठरला.
तुकाराम मुंढेच्या नेतृत्वाखाली FDA चा अॅक्शन मोड
महाराष्ट्र FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्नसुरक्षा नियमांची तपासणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर सुरू आहे. दुकानं, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर खाद्य व्यवसायांची तपासणी करताना परवाना आणि स्वच्छतेसोबतच अन्न हाताळणीच्या नियमांवरही लक्ष दिलं जात आहे. MCA सारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या परिसरातील आउटलेट्सवर झालेली कारवाई त्यामुळे विशेष चर्चेत आली आहे.
FDAच्या कारवाईतून नेमका संदेश काय?
अन्न व्यवसायासाठी केवळ परवाना घेणं पुरेसं नसून परवाना ज्या नावाने जारी झाला आहे, त्याच नियमांनुसार व्यवसाय चालवणं आणि अन्नसुरक्षेचे निकष पाळणं आवश्यक आहे.
MCA च्या पाच आउटलेट्सवरील कारवाईमुळे अन्न व्यवसायातील परवाना आणि संचालनातील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता या आउटलेट्सकडून पुढील नियमपालनाबाबत काय पावलं उचलली जातात आणि FDAच्या कारवाईनंतर पुढील प्रक्रिया काय होते, याकडे लक्ष लागलं आहे.



