• Home
  • राजकारण
  • महायुतीत वादाची ठिणगी! भाजपच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा, बंद दाराआड काय घडलं?
Top News

महायुतीत वादाची ठिणगी! भाजपच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा, बंद दाराआड काय घडलं?

NCP Claim on BJP Seat

NCP Claim on BJP Seat : मागील आठवड्यात राज्यातील १६ विधानपरिषदेच्या जागांचे (16 seats in the Legislative Council) बिगूल वाजलं. त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना (Maharashtra Politics) प्रचंड वेग आला आहे. महायुतीमध्ये जागावाटपावरून (Seat Sharing) जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अनेक नेते मंडळी उमेदवारी मिळवण्यासाठी कधी मित्र पक्षाच्या तर कधी विरोधकांच्या दारात हजेरी लावताना दिसून येत आहे. असाच एक प्रकार महायुतील नेत्यांमध्ये घडल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Deputy CM Sunetra Pawar) यांच्या बंगल्यावर भाजप आमदार गेल्याचे आणि बंद दाराआड चर्चा झाल्याचं सांगितलं आहे.

हेही वाचा – कांद्याच्या प्रश्नावर चांदवडमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार; महामोर्चा, रास्तारोकोतून तीव्र आंदोलन

नांदेड विधानपरिषद मतदारसंघाची जागा आपल्याच पक्षाला मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी देवगिरी बंगल्यावर गर्दी करायला सुरुवात केली आहे. नांदेडमधील आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी थेट देवगिरी बंगल्यावर हजेरी लावली. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन नांदेडच्या जागेबाबत सविस्तर चर्चा केली. नांदेड विधानपरिषदेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसलाच सुटली पाहिजे, अशी आग्रही भूमिका यावेळी चिखलीकरांनी या भेटीदरम्यान मांडली आहेत.

अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत

दरम्यान, प्रतापराव चिखलीकरांच्या या पवित्र्यामुळे महायुतीच्या अंतर्गत गोटात मोठी खळबळ उडाली आहे. नांदेडच्या राजकीय वर्तुळात अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यातील पारंपरिक संघर्ष सर्वश्रुत आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आता विधानपरिषदेच्या या एका जागेवरून महायुतीतील मित्रपक्षात असलेले चिखलीकर आणि चव्हाण गट आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चव्हाण यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी चिखलीकरांची खेळी

भाजपकडून माजी आमदार अमरनाथ राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांचे समर्थकाच या जागेसाठी आग्रही असतानाच आता चिखलीकरांनी ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात नेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. चव्हाण यांच्या स्थानिक वर्चस्वाला शह देण्यासाठीच चिखलीकरांनी ही खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी मतदान करणार आहेत. या मतदार संघात भाजपचं पारडं त्यामानाने थोडेफार वरचढ ठरणार आहे.

दोन्ही पक्षांतील आमदार खासदारांकडून पक्षश्रेष्ठींवर दबाव

आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता दोन्ही पक्षांतील आमदार खासदारांकडून पक्षश्रेष्ठींवर दबाव आणला जात आहे. चिखलीकरांच्या आग्रहामुळे ही जागा राष्ट्रवादीला सुटणार की भाजप आपल्याकडेच ठेवणार, यावर महायुतीतील पुढील गणितं अवलंबून आहेत. आगामी दोन-तीन दिवसांत महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या जागेकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts