Nashik Chandwad Onion Protest: नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कांद्याच्या दराच्या प्रश्नावर शेतकरी आणि महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी क्रांती महामोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार आंदोलन छेडले. यावेळी चांदवड चौफुली मार्गावर रास्तारोको करण्यात आला.
आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी तसेच रोहित पवार, दानवे, सपकाळ आणि शशिकांत शिंदे यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आपला निषेध नोंदवला, तर काही शेतकरी बैलगाड्या घेऊन मोर्चात सहभागी झाले. कांद्याला किमान २५ रुपये प्रतिकिलो (३ हजार रुपये क्विंटल) हमीभाव मिळावा, ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा: २६ मे शुभ दिवस! ‘या’ राशींना मिळणार नोकरी-धंद्यात मोठा फायदा, वाचा आजच तुमचं राशी भविष्य
आंदोलनात रोहित पवार सहभागी
या आंदोलनात रोहित पवार यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. तसेच दानवे, सपकाळ आणि शशिकांत शिंदे यांसारखे नेतेही आंदोलनात सहभागी झाले होते.
दरम्यान, “शेतकऱ्यांसाठी हीच ती निर्णायक वेळ आहे. कांद्याला किमान ३ हजार रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे,” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. १८ तारखेला लासलगाव येथे झालेल्या आंदोलनानंतर दरात साडेतीन रुपयांची वाढ झाली होती, मात्र ती अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कांद्याला २४ रुपये दर देण्याचे आश्वासन देण्यात आले
यावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “२०२३ च्या निवडणुकीपूर्वी कांद्याला २४ रुपये दर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र निवडणुकीनंतर केवळ साडेबारा रुपये दर देण्याची भूमिका घेतली जात आहे,” असा आरोप करण्यात आला.
एकूणच, कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चांदवडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत सरकारला इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, सरकारच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






