Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत अनेक भागांत मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. मुंबई, पुण्यासह काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
सप्टेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी राज्यासह देशातील अनेक भागांत मान्सूनची सक्रियता कायम आहे. आगामी काही दिवसांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुणे यांसह अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सामान्यतः सप्टेंबरच्या मध्यापासून देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून मान्सूनच्या परतीला सुरुवात होते. मात्र, यंदा वातावरणातील बदलांमुळे मान्सूनचा मुक्काम आणखी काही काळ लांबण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत देशाच्या विविध भागांत पावसाची स्थिती कायम राहू शकते.
हेही वाचा: पुण्यातील बुधवार पेठेत FDA चा छापा; संशयित खवा-पनीरचे सॅम्पल घेतले, पुढील तपास सुरू
१२ आणि १३ सप्टेंबरला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामानाच्या स्थितीत पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. १२ आणि १३ सप्टेंबरदरम्यान देशातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढू शकतो.
यानंतर १४ सप्टेंबरला काही भागांत पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, १५ सप्टेंबरपासून पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांत मुसळधार पावसासह वीज पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील काही भागांसाठीही जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस होऊ शकतो.
११ सप्टेंबर: नाशिक घाट परिसर, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
१२ सप्टेंबर: धुळे, नाशिक, नाशिक घाट, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.
१३ सप्टेंबर: पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, पुणे आणि पुणे घाट, सातारा व सातारा घाट, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
१४ सप्टेंबर: नाशिक घाट, पुणे घाट, पुणे, अहिल्यानगर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
यलो अलर्ट असलेल्या भागांत पावसासोबत विजांचा कडकडाट आणि वादळी वारे जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या ताज्या सूचनांकडे लक्ष ठेवावे. वीजांचा कडकडाट सुरू असताना मोकळ्या मैदानात, झाडाखाली किंवा विद्युत खांबांच्या जवळ थांबणे टाळावे, तसेच गरज नसल्यास प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी.









