Solapur Raid Action: सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई करत तीन ऑर्केस्ट्रा बारवर छापे टाकले. या कारवाईत ९१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे १ कोटी २१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री मोठी कारवाई करत एकाच वेळी तीन ऑर्केस्ट्रा बारवर छापे टाकले. उत्तर सोलापूर आणि बार्शी तालुक्यात झालेल्या या धडक कारवाईत ९१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून तब्बल १ कोटी २१ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा: चौथी-सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा ‘या’ तारखेला; कडक उन्हामुळे पालक-विद्यार्थी हैराण
ऑर्केस्ट्रा बार कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली नियमबाह्य वेळेत सुरू असलेले कार्यक्रम, महिलांना नृत्यास भाग पडणे आणि अवैध पैशांची उधळण होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष पथके तयार करून १७ एप्रिलच्या पहाटे ही कारवाई करण्यात आली. ही मोहीम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.
3 बारवर एकाच वेळी छापे
कॅसिनो ऑर्केस्ट्रा बार (कौडी)
सोलापूर तालुका पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ११ महिला आणि २३ ग्राहक आढळले. येथून लॅपटॉप, साउंड सिस्टम, रोख रक्कम आणि वाहने असा मिळून सुमारे ४६.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सुखसागर ऑर्केस्ट्रा बार (खेड)
या ठिकाणी ७ महिलांना नृत्यास भाग पाडले जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी १८ ग्राहकांना ताब्यात घेऊन सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सेन्ट्रो ऑर्केस्ट्रा बार (बळेवाडी, बार्शी)
बार्शी तालुक्यातील या बारवर कारवाई करताना १८ महिला नृत्य करताना आढळल्या. येथे ९ ग्राहकांसह तलवार, मोबाईल, वाहने आणि साउंड सिस्टीम असा एकूण ५७.५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
एकूण कारवाई
या संपूर्ण मोहिमेत ९१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून १ कोटी २१ लाख ८३ हजार रुपयांपेक्षा अधिक मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत ग्रामीण पोलिसांच्या विविध पथकांनी सहभाग घेतला.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून जिल्ह्यातील अशा प्रकारच्या अवैध आस्थापनांवर कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.











