TamilNadu Election : तमिळनाडूमधील सत्तासंघर्ष अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून थालापती विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके ने बहुमतासाठी आवश्यक असलेला जादुई आकडा पार केला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर आता व्हिसिके या पक्षाने पण TVKला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे तमिळनाडूमध्ये नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असून TVKचे शिष्टमंडळ आज, ९ मे रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यपाल आर.व्ही.आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील बदलत्या राजकीय वातावरणामुळे राजधानी चेन्नईसह विविध भागांत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
काँग्रेसचा पाठिंबा
दरम्यान, काँग्रेसने TVKला पाठिंबा देताना एक महत्त्वाची अट घातली आहे. कोणत्याही जातीयवादी शक्तींना आघाडीत स्थान दिले जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसकडून मांडण्यात आली आहे. या भूमिकेमुळे आगामी सरकारच्या धोरणांबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. TVK समर्थकांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पक्ष कार्यालयांबाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि मिठाई वाटत जल्लोष सुरू केला आहे. विजय यांच्या नेतृत्वाखाली तमिळनाडूमध्ये पर्यायी राजकारणाला बळ मिळाल्याची भावना समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.
VCK चे समर्थन
TVK चे नेते आधव अर्जुन यांनी सांगितले की, माध्यमांशी बोलताना सांगितले की, VCK प्रमुख थोल. थिरुमावलावनयांनीयांनी अधिकृतरित्या TVKला पाठिंबा दिल्याची पुष्टी केली आहे. यासंदर्भात समर्थन पत्रही जारी करण्यात आले असून, राज्यात स्थिर सरकार स्थापनेसाठी हा पाठिंबा निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. TVK पक्षाचे 108 आणि काँग्रेसचे 5, भाकप आणि माकप चे ४ VCK चे २ अश्यातर्हेने टीव्हीकेचे बहुमत सिद्ध झाले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या विजय यांच्यासाठी हा सर्वात मोठा राजकीय टप्पा मानला जात आहे. तमिळनाडूमधील पारंपरिक राजकारणाला आव्हान देत TVKने अल्पावधीत मोठे जनसमर्थन मिळवले असून, आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठे बदल दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.











