Vijay’s Swearing-in Ceremony : तमिळनाडूच्या राजकारणात (Tamil Nadu Politics) सध्या मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. अभिनेता ते राजकारणी बनलेला थलपती विजयच्या TVK पक्षाने विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. असं असलं तरी विजयला अद्याप सरकार स्थापन करता आलेलं नाही. याला कारण ठरलेले तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर (Governor Rajendra Arlekar) यांच्या भूमिकेवर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी सडकून टीकास्त्र डागले आहे. मात्र, हे महोदय आपला निर्णय बदलाला काही केल्या तयार नाहीत. अशातच अभिनेते प्रकाश राज (Actor Prakash Raj) यांनी उघडपणे विजयला पाठिंबा दिला असून त्यांनी देखील राज्यपालांवर निशाना साधलाय.
हेही वाचा – निदा खान हिला संभाजीनगर मधून अटक; जलील यांच्या चौकशीची मागणी
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत TVK पक्षाने 233 पैकी तब्बल 108 जागांवर विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधलं. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाने DMK आणि AIADMK सारख्या जुन्या आणि प्रभावशाली पक्षांनाही मागं टाकलं. सरकार स्थापन करण्यासाठी 118 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे तर TVK कडे सध्या 108 जागा आहेत. त्यामुळे विजयकडे सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसा आकडा नाही. 6 मे रोजी थलपती विजयने सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली होती. मात्र, आवश्यक बहुमत नसल्याचं सांगत राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्यास नकार दिला. दुसऱ्या दिवशीही विजयनं पुन्हा प्रयत्न केला परंतु त्यावेळीही निराशाच पदरी पडली.
राज्यपालांचे हे वर्तन घृणास्पद, अस्वीकार्य – प्रकाश राज
या प्रकरणावर प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर संतप्त पोस्ट शेअर केली. त्यांनी TVK कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ री-शेअर करत लिहिले की, ‘राज्यपालांचे हे वर्तन घृणास्पद, अस्वीकार्य आणि असंवैधानिक आहे. मतभेद असू शकतात पण विजयला जनतेचा कौल मिळाला आहे. त्याला सभागृहात बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळायलाच हवी.’ त्यानंतर आणखी एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ‘जनतेच्या कौलाचा आदर करा आणि विजयला सरकार स्थापनेचा हक्क बजावू द्या.’ एका मुलाखतीतही प्रकाश राज यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. ‘बहुमताचा निर्णय राजभवनात नाही तर विधानसभेत होतो. राज्यपालांना हा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. विजयला बहुमत सिद्ध करू द्या, असे ते म्हणाले. तर दुसरीकडे काही तासांपूर्वी कमल हसन यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
स्टॅलिन यांच्या राजकीय परिपक्वतेचा आदर – कमल हसन
कमल हासन यांचं ट्विट, ‘तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेनं कोणत्याही एका पक्षाला स्वतंत्रपणे सरकार स्थापन करण्याचा अधिकार दिलेला नाही. तमिळनाडूच्या इतिहासात हा निकाल अभूतपूर्व आहे. माझे बंधू एम. के. स्टॅलिन यांनी अशी घोषणा केली आहे की, “आम्ही जनतेनं दिलेल्या कौलचा आदर करतो. आम्ही एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून कार्य करू.” त्यांच्या या राजकीय परिपक्वतेचा मी आदर करतो. सध्या घटनात्मक पदांवर विराजमान असलेल्या व्यक्तीनीही आता तेच कर्तव्य पार पाडलं पाहिजे. ही केवळ मागणी नसून त्यांच्या घटनात्मक कर्तव्याची त्यांना करून दिलेली आठवण आहे,’ असं त्यांनी म्हटलंय.
हे तमिळनाडूच्या जनतेनं दिलेल्या जनादेशाचा अपमान – हसन
यात त्यांनी पुढे लिहिलं, ‘विजय यांच्या नेतृत्नाखालील तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाने 108 जागांवर विजय मिळवला आहे. त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित न करणं, हे तमिळनाडूच्या जनतेनं दिलेल्या जनादेशाचा अपमान करण्यासारखं ठरेल. 233 निवडून आलेले सदस्य अद्याप पदाची शपथ घेऊ शकलेले नाहीत. हा राज्याचा अपमान आहे, हा लोकशाहीला पोहोचलेला धक्का आहे.’ या ट्विटमध्ये कमल हासन यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचाही संदर्भ दिला आहे. ‘एस. आर. बोम्मई खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्टपणे नमूद केलं आहे की बहुमत हे राजभवनात नव्हे तर विधानसभेतच सिद्ध केलं गेलं पाहिजे. मी जे बोलतोय, ते पक्षीय राजकारण नाही. हा एका भारतीय नागरिकाचा धोरणात्मक आवाज आहे. तमिळनाडूच्या जनतेनं दिलेल्या निकालाचा आदर राखलाच पाहिजे,’ असं त्यांनी स्पष्ट केलं.












