SSC Class 10 Result 2026 : गेल्या अनेक दिवसांपासून इयत्ता दहावीचे विद्यार्थी निकालाची वाट पाहात होते. निकाल लागल्यानंतर इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरू होते. त्यामुळे या निकालाकडे विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचेही लक्ष लागलेले आहे. दरम्यान, आतार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल नेमका कधी लागणार, याची तारीख आता समोर आली आहे. खुद्द शिक्षण मंडळानेच ही तारीख घोषित केली असून येत्या 8 मे रोजी दहावीचा निकाल लागणार आहे.
शिक्षण मंडळाने जारी केलेल्या निवेदनानुसार इयत्ता दहावीचा निकाल 8 मे रोजी जाहीर केला जाईल. दुपारी एकवाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईनच दिसणार आहेत. खालील संकेतस्थळांना भेट दिल्यावर विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयातील तसेच एकूण गुण पाहता येणार आहेत.
या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल
१. https://results.digilocker.gov.in
२. https://mahahsscboard.in
३. https://sscresult.mkcl.org
४. https://www.tv9marathi.com
शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध
ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.
गुणपडताळसाठी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी शनिवार, दिनांक ०९/०५/२०२६ ते शनिवार, दिनांक २३/०५/२०२६ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking याद्वारे भरता येईल.










