Suicide of two friends : बुलढाणा शहरातील एका नामांकित शाळेत आठवीत शिकणाऱ्या दोन वर्गमित्रांनी अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी प्रकारामुळे संपूर्ण शहरात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दोन दिवसांत घडलेल्या दोन आत्महत्यांच्या घटनांमुळे पालकवर्ग, शिक्षक आणि विद्यार्थी वर्गात तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – प्राचार्यांच्या मारहाणीने व्यथित विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमधून गंभीर आरोप
शहरातील भारत विद्यालयात आठवीत शिकणारा नमन अरुण राऊत (वय 14) याने नुकतीच आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. नमनचे आई-वडील दोघेही शिक्षक असून ते त्या दिवशी कामासाठी बाहेरगावी गेले होते. त्यावेळ घरात एकटाच असलेल्या नमनने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असतानाच अवघ्या दोन दिवसांनी दुसरी धक्कादायक घटना घडली.
घरात गळफास घेत केली आत्महत्या
काल सायंकाळी अथर्व वैभव राणे (वय 14) या विद्यार्थ्याने शाळेतून घरी परतल्यानंतर सुंदरखेड परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अथर्वचे वडील कारागृह पोलीस म्हणून कार्यरत आहेत. अथर्व आणि नमन हे दोघेही एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकणारे एकदम चांगले वर्गमित्र होते. सलग दोन दिवसांत दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण बुलढाणा शहर हादरून गेले आहे.
आत्महत्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही
या दुर्दैवी घटनांमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अभ्यासाचा ताण, मानसिक दबाव, कौटुंबिक कारणे, सामाजिक किंवा अन्य कोणतेही घटक कारणीभूत आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली असून कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
बुलढाणा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त
दरम्यान, या घटनांमुळे पालकांमध्ये प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. लहान वयात मुलांवर येणारा अभ्यासाचा ताण, अपेक्षांचे ओझे आणि मानसिक तणाव याबाबत गंभीर विचार करण्याची गरज असल्याचे मत पालक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी शाळा, पालक आणि समाजाने एकत्र येऊन प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. या दुःखद घटनेने बुलढाणा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.












