• Home
  • बिजनेस
  • युद्धामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला? महागाईचे संकट दारावर उभे..
Top News

युद्धामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला? महागाईचे संकट दारावर उभे..

Economic inflation

Economic inflation : अमेरिकेनं ठिगणी टाकली आणि युद्ध पेटलं, पण इराण-इस्त्रायलमधील या युद्धाचे परिणाम आता जगावर उमटू लागलेत, फक्त परिणामच नाही, तर जगातील अनेक देश आर्थिकरित्या बरबाद होऊ लागलेत, त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तेलाच्या वाढलेल्या किंमती, तेलाच्या किंमती भयंकर वाढणार असल्याच्या धास्तीनं अनेक देशांची इकॉनॉमी कोसळतेय, भारताला तर याचा सर्वात मोठा फटका बसतोय. इराणने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका-इस्रायलने दिलेल्या इशाऱ्यामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण आहे. या संघर्षाचा थेट परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर होत असून, भारतासारख्या मोठ्या प्रमाणावर इंधन आयात करणाऱ्या देशासमोर ‘महागाईचे’ मोठे संकट उभे राहिले आहे. सर्वसामान्यांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे. पेट्रोल, डिझेल आणि खाद्यतेलाचे दर गगनाला भिडणार का? तर त्यांचं उत्तर हे हो असं आहे.

कच्च्या तेलापैकी सुमारे ८५% तेल आयात केले जाते

कारण भारतात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या तेलापैकी सुमारे ८५% तेल आयात केले जाते. इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात ‘ब्रेंट क्रूड’च्या किमतींमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. युद्धाच्या सुरुवातीला कच्च्या तेलाच्या दराने प्रति बॅरल 116 डॉलरचा टप्पा ओलांडला होता. जर हे युद्ध दीर्घकाळ चालले किंवा इराणने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ बंद केली, तर तेलाचे भाव प्रति बॅरल आणखी वाढू शकतात. 2014 नंतरची आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी वाढ आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लिटर किंमतीत मोठी वाढ होणार

तज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या दरात प्रति बॅरल वाढ झाल्यास भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लिटर किंमतीत मोठी वाढ होऊ शकते. मात्र, सध्या केंद्र सरकार आणि सरकारी तेल कंपन्या किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या देशांतर्गत दर स्थिर आहेत, परंतु ही शांतता किती काळ टिकेल, हे युद्धाच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. आज नव्या समोर आलेल्या माहितीनुसार तेलाचा भडका भारताला मोठा फटका देऊ जाईल.

खाद्यतेलाचे भाव प्रति लिटर १० ते १५ रुपयांनी वाढण्याची शक्यता

केवळ इंधनच नव्हे तर तुमच्या स्वयंपाकघरातील बजेटवरही या युद्धाचं सावट आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा खाद्यतेल आयातदार देश आहे. भारत मोठ्या प्रमाणात सूर्यफूल तेल रशिया आणि युक्रेनकडून, तर पाम तेल इंडोनेशिया आणि मलेशियाकडून आयात करतो. आखाती देशांमधील युद्धामुळे सागरी वाहतुकीचे मार्ग धोक्यात आले आहेत. युद्धाच्या भीतीमुळे जहाजांचे विमा दर आणि मालवाहतूक खर्च वाढले आहेत. याचा थेट परिणाम तेलाच्या किमतींवर होत असून, किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे भाव प्रति लिटर १० ते १५ रुपयांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घरगुती सिलिंडर आता ९०० रुपयांच्या पार

मार्च २०२६ च्या सुरुवातीलाच व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. दिल्लीत घरगुती सिलिंडर आता ९०० रुपयांच्या पार गेला आहे. आखाती देशांतून होणारी नैसर्गिक वायूची आयात विस्कळीत झाल्यास, भविष्यात गॅसच्या किमतीत आणखी वाढ होण्याची भीती आहे. इंधन महागल्याचा परिणाम मालवाहतुकीवर होतो, ज्यामुळे भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत आपोआप वाढ होते.

तेल कंपन्यांकडे ६५ दिवसांचा साठा उपलब्ध

युद्धजन्य परिस्थिती असली तरी भारताने काही खबरदारीचे उपाय योजले आहेत, भारताने जमिनीखाली मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचा साठा करून ठेवला आहे, जो आपत्कालीन परिस्थितीत सुमारे ९ ते १० दिवस पुरू शकतो. याशिवाय तेल कंपन्यांकडे ६५ दिवसांचा साठा उपलब्ध आहे. सौदी अरेबिया आणि इराणवर अवलंबून न राहता भारत रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करत आहे. मात्र अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताला रशियाकडून केवळ 30 दिवस तेल खरेदीची मुभा देण्यात आली आहे, त्यामुळे आता भारतात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे, यावरून भारताच्या परराष्ट्र धोरणावर सडकडून टीका होत आहे.

सोन्याच्या किमतीनेही 1,65,000 हजारांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला

युद्धाच्या सावटाखाली गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे धाव घेतली आहे. यामुळे सोन्याच्या किमतीनेही 1,65,000 हजारांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत असून, परदेशी गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. सध्यातरी भारत सरकार दरवाढ रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, इस्त्रायलनं इराणच्या तेल प्रकल्पावर आणखी हल्ले केल्यास जागतिक बाजारपेठेत ऑईल शॉक बसू शकतो. अशा स्थितीत एप्रिल-मे २०२६ पर्यंत भारतात इंधन आणि तेलाचे दर नव्या उच्चांकावर पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतमाल आणि इतर निर्यात परदेशात पोहोचत नाही

आधीच महागाईनं भारतीयांचं कंबरडं मोडलं आहे, त्यात आता युद्धाचा झळ बसत असल्यानं भारताचा शेतमाल आणि इतर निर्यात परदेशात पोहोचत नाही, त्यामुळे अनेकांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय, त्यातच दोन दिवसांपूर्वी भारतात गॅसच्या किंमती मोठ्या प्रमाणात भडकल्या, त्यानंतर अनेकांचं बजेट कोलमडलं आहे, सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायिकांचंही मोठं नुकसान झालंय, त्यातच आता जर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही वाढल्या तर मात्र भारतीय अर्थव्यवस्थेवर यांचे अत्यंत कटू परिणाम होतील, ज्यातून बाहेर निघणं भारतीयांसाठी सोप्पं नसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts