Abhijeet Deepke: नवी दिल्लीतील जंतर- मंतर येथे आयोजित आंदोलनात सहभागी झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अभिजीत दिपके महाराष्ट्रात परतले. बुधवारी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्याचे समर्थकांनी उत्साहात स्वागत केले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर आणि सोशल मीडियावरील उपस्थितीवर टीका केली.
दिपके त्या व्हिडियोवर नेमकं काय म्हणाले?
दीपके म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडच्या काळात शॉर्ट व्हिडिओ आणि सोशल मीडिया कंटेंटवर अधिक भर देताना दिसत आहेत. यावर भाष्य करताना त्यांनी, “जर ते हेच काम इतक्या प्रभावीपणे करत असतील, तर त्यांनी इन्फ्लुएन्सर म्हणून काम करावं आणि प्रशासनाची जबाबदारी दुसऱ्या सक्षम व्यक्तीकडे द्यावी,” अशी उपरोधिक टिप्पणी केली.
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्यानंतर अभिजीत दीपके यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी विविध राष्ट्रीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांच्या विधानाचाही उल्लेख केला. पंतप्रधानांच्या सोशल मीडिया व्हिडिओंवर प्रतिक्रिया देताना प्रियांका गांधी यांनी, “कॅमेऱ्याचा अँगल बदलण्यापेक्षा मनाचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे,” असे मत व्यक्त केले होते.
पेपरफुटीविरोधी कायद्याबाबत बोलताना दीपके
पेपरफुटीविरोधी कायद्याबाबत दीपके म्हणाले की फक्त नवीन कायदे करून प्रश्न सुटणार नसल्याचे सांगितले. त्यांच्या मते, कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली तरच विद्यार्थ्यांना न्याय मिळू शकतो. अन्यथा नवीन विधेयके मंजूर झाली तरी त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येणार नाही.
पेपरफुटी प्रकरणांसाठी जलदगती न्यायप्रक्रियेची घोषणा करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात पहिल्याच सुनावणीला सरकारी बाजूने आवश्यक उपस्थिती नसल्याने प्रक्रिया पुढे ढकलली गेल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे केवळ घोषणा किंवा कायदे पुरेसे नसून, त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणारी यंत्रणा अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.









