Dimagi Naxal Janata Party : सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी तरूणांबाबत कॉक्रोच असा उल्लेख केला आणि कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली….कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत आंदोलन केलं आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला…यानंतर जणू भारतात आंदोलनाला आणि मीम्स पार्टी बनवायला एक नवीन सुरूवातच झालीये…कॉक्रोच जनता पार्टीनंतर E 20 पार्टी बनली होती…यानंतर आता नवीन दिमागी नक्सल जनता पार्टी स्थापन झाली आहे…पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषणात दिमागी नक्सली असा उल्लेख केला होता…यानंतर तरूणांमध्ये एकच आक्रोश पाहायला मिळाला…पंतप्रधानांनी दिमागी नक्सली असा उल्लेख करताच सोशल मीडियावर दिमागी नक्सली जनता पार्टी ट्रेंड व्हायला लागली…काही तासाच या पार्टीचे 2 लाखांहून अधिक फॉलोवर्स झाले…पण पंतप्रधानांनी दिमागी नक्सल असा उल्लेख का केला? दिमागी नक्सली जनता पार्टीचा स्थापन करण्यामागे कारण काय? देशात सध्या सुरू काय आहे?
‘दिमागी नक्सल’ शब्दावरून तरुणांमध्ये संताप का? ( Dimagi Naxal Janata Party )
तरूणांचा आणि कॉक्रोच जनता पार्टीचा दिल्लीत मोठं आंदोलन झालं आणि केंद्र सरकारला तरूणांसमोर झुकावं लागलं…यानंतर तरूण सर्व मुद्द्यावर सरकारला घेरताना पाहायला मिळत आहे..झारखंडमध्ये पेपरफुटी झाली विद्यार्थी रस्त्यावर उतरले…त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेत पेपर फुटल्याचा आणि मोठा तांत्रिक गोंधळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला..विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि यातूनही तोडगा निघाला…त्यामुळे आता देखील पंतप्रधानांच्या टीकेनंतर थेट ‘दिमागी नक्सल जनता पार्टी’ची स्थापना करण्यात आली आहे…भारतीय लोकशाहीमध्ये सरकारला प्रश्न विचारण्याची आणि धोरणांचा विरोध करण्याची ही ‘Gen-Z’ म्हणजेच आजच्या तरुण पिढीची एक नवीन आणि अत्यंत प्रभावी पद्धत ठरत आहे…
दिमागी नक्सली जनता पार्टी प्रकरणाची पाळेमुळे 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात आहेत… स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधानांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर भाष्य केलं… जंगलात राहून हिंसक कारवाया करणाऱ्या आणि शस्त्रांच्या जोरावर व्यवस्था बदलू पाहणाऱ्या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यात सुरक्षा दलांना मोठं यश आलं आहे..मात्र, सशस्त्र नक्षलवाद आता संपत आला असला तरी समाजात आणि शहरांमधील बौद्धिक वर्गात लपलेले ‘दिमागी नक्सल’ म्हणजेच वैचारिक नक्षलवादी अजूनही सक्रिय आहेत… हे लोक सरकारच्या कल्याणकारी धोरणांना विनाकारण खिळ घालतात, देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि संसदेवर अविश्वास दाखवतात आणि देशातील सुशिक्षित तरुणांची दिशाभूल करून त्यांना भडकवण्याचे काम करतात. देशवासीयांनी अशा विचारसरणीच्या लोकांना ओळखून त्यांना समाजात पूर्णपणे वेगळे केले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते.
मोदींनी 15 ऑगस्टच्या भाषणात ‘दिमागी नक्सल’ का म्हटलं?
पंतप्रधानांचे हे विधान समोर आल्यानंतर देशातील सुशिक्षित आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण वर्गामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली… गेल्या काही काळापासून विविध सरकारी परीक्षांमधील गोंधळ, पेपरफुटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांमुळे तरुण आधीच संतप्त होते… अशा परिस्थितीत, जेव्हा जेव्हा नागरिक, विद्यार्थी सरकारला प्रश्न विचारतात किंवा त्यांच्या धोरणांवर टीका करतात, तेव्हा त्यांना थेट ‘नक्षलवादी’ किंवा ‘देशविरोधी’ ठरवले जाते, अशी भावना तरुणांमध्ये निर्माण झाली…याच आक्रोशातून आणि पंतप्रधानांच्या विधानाचा उपरोधिक निषेध करण्यासाठी 15 ऑगस्टच्या रात्रीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि एक्सवर ‘दिमागी नक्सल जनता पार्टी’ नावाचे हँडल तयार करण्यात आले… जर सरकारला प्रश्न विचारणारा आणि स्वतःची बुद्धी वापरणारा प्रत्येक सुशिक्षित नागरिक तुमच्या दृष्टीने ‘दिमागी नक्षल’ असेल, तर होय, आम्ही ‘दिमागी नक्षल’ आहोत आणि आम्ही आमची स्वतंत्र पार्टी सुरू करत आहोत, अशी घोषणा करत तरुणांनी या डिजिटल मोहिमेचे बिगुल फुंकले….
हेही वाचा : सिब्बल म्हणतात नार्वेकरांचा निर्णय चुकीचा; नार्वेकरांचा पलटवार, ‘आरोप बिनबुडाचे’
‘Think, Research, Resist’ आणि ‘दिमाग युझ करो’चा संदेश काय? ( Dimagi Naxal Janata Party )
या पक्षाने आपले मुख्य ब्रीदवाक्य “सोचो, रिसर्च करो, विरोध करो” म्हणजेच “Think, Research, Resist” असे ठेवले आहे. तसेच “दिमाग युझ करो” हा त्यांचा मुख्य नारा बनला आहे. कोणत्याही अंधविश्वासाला बळी न पडता देशातील नागरिकांनी तथ्य आणि तर्काच्या आधारे विचार केला पाहिजे, असा संदेश ही मोहीम देत आहे… या डिजिटल पक्षाच्या इन्स्टाग्राम बायोमध्येही अत्यंत धारदार व्यंग पाहायला मिळते.. यामध्ये पक्षाच्या संस्थापकाचा उल्लेख ‘एक दिमागी भारतीय’ असा करण्यात आला आहे, तर सह-संस्थेच्या जागी थेट सत्ताधाऱ्यांना टोमणा मारणारा शब्दप्रयोग वापरण्यात आला आहे. हा ग्रुप क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग यांच्या विचारसरणीला आपली मुख्य प्रेरणा मानतो.
या वाढत्या लोकप्रियतेमुळे या डिजिटल चळवळीला केवळ सामान्य तरुणांचाच नाही, तर देशातील अनेक मोठ्या सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांचा पाठिंबा मिळत आहे… दुसरीकडे विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरून सरकारवर हल्ला चढवला आहे…काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी अधिकृतपणे सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, मला ‘दिमागी नक्सल‘ असल्याचा अभिमान आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या समर्थकांनीही या ट्रेंडला मोठ्या प्रमाणावर रीपोस्ट करून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला…
वाढते वादळ आणि राजकीय वाद पाहून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला यावर अधिकृत स्पष्टीकरण द्यावे लागले.. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी एका विशेष पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या विधानाचा अर्थ समजावून सांगितला… ते म्हणाले की, पंतप्रधानांचा रोख देशातील सामान्य किंवा प्रश्न विचारणाऱ्या तरुणांवर अजिबात नव्हता… ‘दिमागी नक्सल’ हा शब्द अशा लोकांसाठी वापरला गेला आहे, जे लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संसदेपेक्षा रस्त्यावरील आंदोलनांच्या माध्यमातून स्वतःचे निर्णय देशावर लादू पाहतात… जे देशाच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या नक्षलवाद्यांना आणि देशविघातक घटकांना पडद्यामागून बौद्धिक पाठिंबा देतात आणि देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या मृत्यूवर आनंद साजरा करतात, अशा देशविरोधी विचारसरणीला पंतप्रधानांनी चिन्हांकित केले आहे.. मात्र, भाजपच्या या स्पष्टीकरणानंतरही सोशल मीडियावरील तरुणांचा रोष शांत झालेला नाही आणि या डिजिटल पक्षाची व्याप्ती सातत्याने वाढतच आहे…
दरम्यान, या पक्षाच्या अकाऊंट्सवर मोठे सायबर हल्ले झाल्याची माहितीही समोर आली आहे. दिमागी नक्सल जनता पार्टीच्या अधिकृत हँडलवरून सांगण्यात आले की, पेज वेगाने व्हायरल होत असल्याने ते बंद पाडण्यासाठी रिपोर्टिंग आणि सायबर अटॅक्स केले गेले, ज्यामुळे काही काळासाठी इन्स्टाग्रामने हे अकाऊंट अनअव्हेलेबल केले होते, परंतु तरुणांच्या एकतेमुळे ते पुन्हा पूर्ववत सुरू झाले आहे…
E20 जनता पार्टीची सोशल मीडिया मोहीम काय होती?
‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या या ऐतिहासिक यशानंतर जुलै महिन्याच्या शेवटी ‘E20 जनता पार्टी‘चे आगमन झाले. केंद्र सरकारने देशभरातील पेट्रोल पंपांवर २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल म्हणजेच ‘E20 इंधन’ सक्तीचे केले आहे… या धोरणामुळे जुन्या गाड्यांचे आणि विशेषतः दुचाकींचे इंजिन खराब होत असून, वाहनांचे मायलेज कमालीचे घटले आहे, असा आरोप वाहनधारकांनी केला. “आमची गाडी, आमचा पैसा, आमचा अधिकार” म्हणत वाहनधारकांनी ‘E20 जनता पार्टी’ सुरू केली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ग्राहकांना इंधनाचा स्वतंत्र पर्याय मिळावा अशी मागणी केली… या आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनीही पेट्रोल पंपांवर पुन्हा कमी इथेनॉल असलेले पेट्रोल उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहेत…
Dimagi Naxal Janata Party : आता या संपूर्ण साखळीमध्ये ‘दिमागी नक्सल जनता पार्टी‘ हा तिसरा आणि अत्यंत मोठा टप्पा ठरला आहे. या तीनही आंदोलनांकडे पाहिल्यास देशातील राजकारणाचा आणि आंदोलनाचा पोत कसा बदलत आहे, याचे स्पष्ट संकेत मिळतात.. पूर्वीच्या काळी कोणत्याही आंदोलनासाठी मोठ्या राजकीय पक्षांची, त्यांच्या निधीची आणि नेत्यांची गरज पडत असे… मात्र, आजचा सुशिक्षित तरुण वर्ग कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता, केवळ इंटरनेट, मीम्स आणि सोशल मीडिया पेजेसच्या माध्यमातून स्वतःचे स्वतंत्र दबाव गट निर्माण करत आहे… सरकारकडून जेव्हा जेव्हा आंदोलक किंवा टीकाकारांना विशिष्ट नावाने संबोधित करून नामोहरम करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा तरुण त्या नावाचाच एक ‘ब्रँड’ बनवून सरकारवर पलटवार करतात, हे या आंदोलनांचे मुख्य वैशिष्ट्य आहे..
एकंदरीत पाहता, ‘दिमागी नक्सल जनता पार्टी’ हे केवळ एक सोशल मीडिया पेज राहिलेले नाही, तर ते देशातील सुशिक्षित तरुणांच्या सामूहिक अक्रोषाचे आणि विचारस्वातंत्र्याचे एक मोठे प्रतीक बनले आहे. ही डिजिटल चळवळ येणाऱ्या काळात देशाच्या मुख्य प्रवाहातील राजकारणावर आणि सरकारच्या धोरणांवर किती दूरगामी परिणाम करते, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे…









